पंढरपूर

अभिजित पाटील यांचे समाजासाठी सुरू असलेले योगदान भविष्यात वाया जाणारे नाही :-भास्करराव पेरे पाटील

सचिन झाडे
पंढरपूर – (प्रतिनिधी)

पंढरीतील उद्योजक अभिजीत पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपले योगदान देण्याची जी पद्धत सुरू केली आहे, ती भविष्यात वाया जाणारी नाही, हे कार्य असेच सुरू ठेवावे , असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले .पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते . यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उद्योजक अभिजीत पाटील, मनसे चे राज्याचे नेते दिलीप धोत्रे,पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, पंढरपूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . उद्योजक अभिजीत पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पंढरपूर तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आणि उपसरपंच उपस्थित होते. यावेळी बिनविरोध झालेल्या जैनवाडी ग्रामपंचायतीस एक लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला.

प्रत्येक गावचा विकास कसा होऊ शकतो, यावर पोटतिडकीने बोलताना पाटील यांनी उपस्थित सर्वांचीच मने जिंकली.सदस्यांनी पूर्णवेळ काम करणारा सरपंच गाव कारभारी म्हणून निवडावा. या सरपंचाने गावचा मायबाप म्हणून काम करावे. ग्रामपंचायतीमार्फत गावांमध्ये मोठे काम उभारले जाऊ शकते गावचा चेहरामोहरा बदलता येणे सहज शक्य आहे यासाठी सरपंचांनी पूर्ण वेळ देणे गरजेचे असल्याचे मत पेरे पाटील यांनी व्यक्त केले. आपल्या भागाचा विकास व्हावा ही कल्पना बाळगून पंढरपूर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणारे उद्योजक अभिजीत पाटील यांनी समाजासाठी यापुढेही आपले योगदान द्यावे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या भागात उद्योग निर्माण होतील याबाबतची दृष्टी बाळगावी आपापल्या भागात बेरोजगारांना उद्योग निर्माण करून द्यावेत असे मत अभिजित पाटील यांनी व्यक्त केले.

लोकप्रतिनिधींच्या सक्षमीकरणासाठी अभिजीत पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांसाठी घेतलेला हा कार्यक्रम निश्चितच स्तुत्य असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले . पराकोटीच्या राजकारणामुळे गावचा विकास खुंटतो. कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यास, विकास झाल्याशिवाय राहत नाही, परंतु तसे होताना दिसत नाही . यासाठी प्रत्येक ग्रामसंसदेने विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास पंढरपूर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते,नुतन ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच, उपसरपंच यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

उद्योजकीय दृष्टी असलेल्या अभिजीत पाटील यांनी विधायक कार्यक्रमांचा झपाटा चालविला आहे. आपल्या भागाचा विकास व्हावा ,यासाठी ते झटत आहेत. विकासाचे उगमस्थान जिथून होते, त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी पंढरपूर येथे मेळावा आयोजित केला . यासारखे विधायक कार्यक्रम त्यांच्या हातून कायमच घडत रहावेत , अशी सदिच्छा राष्ट्रीय पुरस्कार विजेते सरपंच विश्वासराव पाटील यांनी पंढरीत व्यक्त केली.

Related posts