महाराष्ट्र

एसीचा स्फोट झाल्याने १३ जणांचा होरपळून मृत्यू

विरार येथे विजय वल्लभ रुग्णायलात लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसीचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयाच्या चार मजल्यांपैकी दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. नाशिक येथील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने रुग्णालये सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने १३ जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. याचबरोबर रुग्णालयात अडकलेल्या इतर रुग्णांची सुटकाही करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, अतिदक्षता विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.
विरार (प.) येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आज (दि.२३) पहाटे ३.१३ वाजताच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास आग विझवली आहे. सदर घटनेत १३ रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला असून ५ ते ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आयसीयू उपचार कक्षातील एसीमध्ये स्फोट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेत मृत झालेल्या व्यक्तींची नावे
१) उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष ६३)
२) निलेश भोईर, (पु/वय वर्ष ३५)
३) पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव, (पु/वय वर्ष ६८)
४) रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष ६०)
५) नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष ५८)
६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष ६३)
७) कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष ४५)
८) रमेश उपयान (पु/वय वर्ष ५५)
९) प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष ६५)
१०) अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष २३)
११) शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष ४८)
१२) सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष ६४)
१३) सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष ४३)

Related posts