उस्मानाबाद 

कोरोनावर मात करून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेच्या सेवेस दाखल.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे कोरोनावर मात करून पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हा रुग्णालयातील लिक्वीड ऑक्सिजन टँक तात्काळ कार्यान्वित करण्याबरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या सुरळीत पुरवठ्याबाबत माहिती घेतली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने यापुढे हे इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयामधून संबंधित रुग्णाच्या नावाने रुग्णालयास दिले जाईल व त्याच रुग्णास ते इंजेक्शन वापरणे त्या रुग्णालयास बंधनकारक असेल. यामुळे आवश्यक अशाच रुग्णांना इंजेक्शनचा वापर होईल व सुरू असलेला काळाबाजार थांबेल.

तसेच अत्यंत उपयुक्त अशा कोरोना लसीचा पुरवठा सुरळीत होत आहे का? याची माहिती त्यांनी घेतली. लसीचा पुरवठा मोठय़ा प्रमाणात होण्यासाठी पाठपुरावा करू तसेच जोपर्यंत चाचणीची गती वाढवली जाणार नाही तोपर्यंत रुग्णसंख्येवर आळा घालता येणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्यावर भर देण्याची सूचना त्यांनी केली आहे. रुग्णांना बेड उपलब्धतेबाबत अडचण येऊ नये म्हणून पुरेसे बेड उपलब्ध आहेत का? याची माहितीही त्यांनी घेतली. कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्यास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सूचना दिल्या.

या बैठकीस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर, निवासी जिल्हाधिकारी स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अन्न व औषध प्रशासन उपआयुक्त दुसाने आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related posts