उस्मानाबाद  तुळजापूर

हॅलो फाउंडेशन च्या वतीने धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक अभियान.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – कोरोनाच्या काळात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये अनेक विवाह सोहळे हे पार पडत आहेत.यामध्ये विशेषतः मराठवाड्यात ५०% विवाह हे बालविवाह झाले असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर मधल्या हॅलो मेडिकल फाऊंडेशन या संस्थेच्या अभ्यासातून निर्दशनास आले आहे. हॅलो मेडिकल ही एक सामाजिक संस्था असून जिल्ह्यातील शेतकरी, युवकांच्या तसेच महिलांच्या प्रश्नासाठी ही संस्था गेल्या २० वर्षांपासून काम करत आहे.

हॅलोच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावात जाऊन “निर्धार समानतेचा ” या प्रकल्पाच्या माध्यमातून बाल विवाह रोखले जावे याकरिता जनजागृती केली जाते आहे. भारत देशासह जगावर ओढवलेल्या कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे शहरांसोबतच ग्रामीण भागातही जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वच गोष्टींवर या आपत्तीचे दुष्परिणाम झालेले आहेत. ते आपण सर्वांनी पाहिलो आणि अनुभवलो आहोतच. या सगळ्या गोष्टींमधून काढता पाय घेत असताना कोव्हीड १९ ने भयानक संकटे आपल्या सर्वांपुढे वाढवून ठेवले आहे. त्यापैकी एक या कोरोनाच्या काळात झालेले एकूण बालविवाह.


जिल्ह्यातील गावागावात जाऊन पथनाट्य, सुसंवादाच्या माध्यमातून जनजागृती करत असताना हॅलोचे कार्यकर्ते.

राज्यातील मराठवाड्यात झालेल्या विवाहापैकी जवळपास ५०% बालविवाह झाले आहेत.खर तर ही बाब खूप चिंताजनक आणि त्याचबरोबर गंभीर ही आहे. बालविवाह म्हणजे १८ वर्ष्याच्या आत मुलींचे आणि २१ आत मुलांचे विवाह होणे. हा बालविवाह होणे म्हणजे मुलांमुलींवर झालेला अन्यायच म्हणावा लागेल. विशेषतः याचे दुष्परिणाम हे अल्पवयीन मुलीवर तीव्र होत असतात. हा एक महिलांवर होणाऱ्या हिंसेचा कडेलोट आहे.

हे बालविवाह रोखले जावे यासाठी अगोदर यासंदर्भात जनजागृती करणं गरजेचं आहे. याकरिता हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या अंतर्गत निर्धार समानतेचा या प्रकल्पाच्या माध्यमातून 1 ते 15 मार्च या कालावधीत तुळजापूर व लोहारा तालुक्यातील तीस गावात बालविवाह प्रतिबंधक हे अभियान राबविले जात आहे. वाढत्या बालविवाहावर प्रतिबंधक करण्यासाठी हॅलो मेडिकल फाउंडेशनने या अभियानाची सुरुवात केली आहे. हॅलो फाऊंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे, यामध्ये कलापथकाच्या माध्यमातून पथनाट्य गाणी,पोवाडे, गावकऱ्यांच्या बैठका किशोरवयीन मुलींच्या बैठका, युवक बैठका, गावकऱ्यांची सुसंवाद आदींद्वारे जनजागृती केली जात आहे.

या अभियानासाठी तुळजापूर तालुक्यातील 15 आणि लोहारा तालुक्यातील 15 अशी एकुण 30 गावे निवडण्यात आली आहेत. या कामी प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, सतीश कदम, नागिनी सुरवसे, वासंती मुळे, श्रीकांत कुलकर्णी, अनुराधा पवार, शिवाजी बुलबुले, अनुराधा जाधव, समाधान कदम, प्रदीप पाटील, राजू कसबे, संतोष डोलारे, रमेश पाटील आदींनी पुढाकार घेतला आहे.

Related posts