अक्कलकोट

वटवृक्ष स्वामी मंदिरातील स्वामींचे दर्शन पुन्हा बंद.

 प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचा मंदिर समितीने घेतला निर्णय

  अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात प्रतिवर्षी २५ डिसेंबर ते २ जानेवारी  अखेर नाताळ सुट्टया, दत्त जयंती, व नुतन वर्षानिमीत्त दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यातच शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी यंदा नाताळ सणाची सुट्टी, शनिवार दिनांक २६ व रविवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सलग शासकीय सुट्टया आहेत. मंगळवार दिनांक २९/१२/२०२० रोजी श्री दत्त जयंती आहे.

गुरूवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व शुक्रवार दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी नुतन वर्षाची सुरूवात इत्यादी सलग गर्दीचे दिवस लक्षात घेवून कोरोना संसर्गाचा फैलाव होवू नये म्हणून प्रशासनाने गुरूवार दिनांक २४/१२/२०२० च्या मध्यरात्री पासून शनिवार दिनांक २ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री पर्यंत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्याचे व भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश मनाई करण्याचेलेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.  त्यानुसार आज दिनांक २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक २ जानेवारीच्या मध्यरात्री पर्यंत वटवृक्ष मंदीर पुन्हा एकदा बंद करण्यात आले असल्याची माहीती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

या कालावधीत कोणत्याही स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरीता मंदीराकडे येण्याचे टाळावे व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच थांबून स्वामींची आराधना करावी असे आवाहनही इंगळे यांनी याप्रसंगी स्वामी भक्तांना केले आहे.  यापसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगेे, मंदार महाराज पुजारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, अविनाश क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, विपूल जाधव, महादेव तेली, गिरीश पवार, महेश मस्कले इत्यादी उपस्थित होते.

Related posts