पंढरपूर

‘जीवनात फोकस आणि व्हिजन नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही’ – छत्रपती खा. संभाजीराजे महाराज

युवराज छत्रपती खासदार संभाजीराजे यांची स्वेरीला सदिच्छा भेट

पंढरपूर –‘मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून मुलांनी सर्वप्रथम शिक्षण आत्मसात करावे. राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक थोर महापुरुषांनी शैक्षणिक क्रांती घडवली. म्हणुन विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. ‘शिक्षण’ म्हणजे केवळ पदवी प्राप्त करणे नसून तुम्ही जगासमोर स्वतःला कसे सादर करू शकता? हे महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे अंगी ‘नेतृत्व गुण’ तयार होतात. शिक्षणामुळे ‘संस्कार’ मिळतात. त्यासाठी जीवनात जे आवडते ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. यासाठी स्वतःवर कोणतीही बंधने लादू नयेत. केवळ पदवी मिळवणे हे अंतिम ध्येय नसून स्वतःपुढे एक निश्चित ध्येय, उद्दिष्ट ठेवा आणि त्या दृष्टीने वाटचाल करा. जर जीवनात फोकस, व्हिजन नसेल तर त्या जीवनाच्या वाटचालीला आणि घेतलेल्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही.’ असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला युवराज छत्रपती खा.संभाजीराजे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.

प्रारंभी छत्रपती खा.संभाजीराजे यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व संस्थेचे अध्यक्ष एन.एस.कागदे यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाची पगडी, शाल, श्रीफळ व विठ्ठल रुक्मिणीमातेची चांदीची मूर्ती देवून स्वागत व सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना छत्रपती खा.संभाजीराजे म्हणाले की ‘जे प्रथम पासून आदर्श शिक्षक आहेत, आदर्श प्राचार्य आहेत आणि आदर्श संघटक देखील आहेत, आणि जे नवीन पिढीला घडवीत आहेत त्या प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सरांबद्धल काय बोलावे? हे सुचत नाही. डॉ. रोंगे सर एक स्वतः आदर्श आहेत. डॉ. रोंगे सरांनी प्रचंड प्रतिकूल परिस्थतीत ही शिक्षण संस्था उभी केली आहे. या ठिकाणी असलेल्या माळरानाचे रुपांतर आज मोठ्या शैक्षणिक नंदनवनात केले आहे. त्यांची शैक्षणिक प्रगती पाहता डॉ.रोंगे सरांचे कौतुक करावेसे वाटते. त्यामुळे नेहमी भाषण करणे वेगळे आणि आज कॉलेज बद्धल आणि सरांबद्धल बोलणे वेगळे. त्याचे कारण असे की ‘आदर्श शिक्षकां’ना मी आणखी काय सांगावे? त्यांना काय उपदेश करावा? खरंच समजतं नाही. ज्यावेळी माझी पहिली भेट डॉ.रोंगे सरांशी झाली त्यावेळी सर म्हणाले की, ‘आमचे स्वेरी हे शैक्षणिक संकुलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्या प्रेरणेने सुरू असून आपण एकदा स्वेरीला भेट द्यावी.’ अशी इच्छा व्यक्त केली. खरंच स्वेरी बद्धल मी खूप ऐकले होते. आता प्रत्यक्ष पाहिले. मला चांगल्या विचारांचा वारसा आहे, छत्रपतींचा वारसा आहे, त्यामुळे मला आपोआप कोणतीही गोष्ट मिळाली नाही. यासाठी मला प्रत्येक गोष्टीसाठी परिश्रम करावे लागले. मी छत्रपतींचा वंशज आहे, वारसदार आहे म्हणून मला पद बहाल केले नाही. हा माणूस राजवाड्यात राहतो आणि समाजासाठी स्वतःला वाहून घेतो म्हणून मला खासदार केले. एकूणच नितांत परिश्रम केल्यानंतर निश्चित फळ मिळते. शिक्षणातील पदवी हा केवळ पाया असून ती मर्यादित असते.यासाठी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय, फोकस आवश्यक आहे. डॉ. रोंगे सर ‘आदर्श प्राचार्य’ बनले ह्याच्या मागे त्यांचे आणि त्यांच्या टीमचे प्रचंड कष्ट आहे, परिश्रम आहे. परिश्रम करताना अपयश आले तर मुळीच खचून जाऊ नका. अपयश हे पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनाही अपयश आले होते. पण ते खचून न जाता त्यांनी आणखी परिश्रम केले आणि विजयश्री मिळवत गड-किल्ले ताब्यात घेतले.’असे सांगून त्यांनी गडकोट किल्ल्याचे जतन करावे आणि पुनर्बांधणी बाबत माहिती दिली.

दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यातर्फे ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल डॉ. बी.पी. रोंगे सरांचा छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भविष्यात स्वेरीच्या कॅम्पसमध्ये येऊन चार हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी देखील युवराज छत्रपती खा.संभाजीराजे यांनी दर्शवली. यावेळी त्यांनी कॅम्पस मधील महत्वाच्या विभागांना भेटी देवून महत्वाच्या बाबी जाणून घेतल्या.

यावेळी त्यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, विजय वाघ तसेच, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी आभार मानले.

Related posts