सोलापूर शहर

गुंठेवारी मिळकतीस बांधकाम परवाना देण्यास अंतिम मुदतवाढ द्या – संभाजी आरमार

सोलापूर महानगरपालिकेने गुंठेवारी मिळकतीस नियमित करण्यासाठी अंतिम मुदतवाढ द्यावी आणि हजारो मिळकतधारकांचे नुकसान टाळावे अशी मागणी संभाजी आरमारच्यावतीने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
सोलापूर महानगरपालिकेने गुंठेवारीने खरेदी केलेल्या मिळकतींना यापुढे बांधकाम परवाना दिला जाणार नाही असा निर्णय घोषित केला आहे. महानगरपालिकेचा हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य जरी असला तरी या निर्णयामुळे सोलापूर शहर हद्दवाढ भागातील हजारो मिळकतधारकांचे आतोनात नुकसान होणार आहे. सोलापूर शहरातील लँड माफियांच्या फसवणुकीचा आणि त्यांना साथ देणाऱ्या तत्कालीन व्यवस्थेच्या भ्रष्ट कारभाराचा फटका सर्वसामान्य सोलापूरकरांना बसणार आहे.

ले-आऊट, बिनशेती आदेश नसलेल्या मिळकतीचे लाच खाऊन खरेदी-विक्री व्यवहार नोंदीत करणे संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांनी टाळून आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडले असते तर अशी अनधिकृत कामे झालीच नसती. सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अशा मिळकती लाखो रुपये उकळून  माथी मारण्यात आल्या आहेत. आता अशाप्रकारे हजारो मिळकतदारांच्या घामाच्या पैशातून खरेदी केलेल्या मिळकती अनधिकृत ठरणार असतील तर हजारो कुटुंबे आणि लाखो माणसे उध्वस्तच होणार आहेत. मिळकतदारांना फसवून व्यवहार करत गब्बरगंड झालेले लँड माफिया आणि त्यांना साथ देणारे लाचखोर अधिकारी यांच्यावर देखील फसवणुकीची फौजदारी कारवाई झाली पाहिजे. ज्या-ज्या मिळकतदारांच्या अशा मिळकती आहेत त्यांनी आता तरी सावध होत आपल्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे. काबाड कष्ट करून कमावलेल्या मिळकती कवडीमोल ठरणार आहेत. वारंवार पूर्णपणे अनधिकृत असणाऱ्या झोपडपट्ट्यानां सरकार नियमित करत असेल तर स्वमालकीच्या या मिळकतींना देखील नियमित करण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. हजारो लोकांच्या संसाराची राखरांगोळी होत असेल तर महापालिकेने अंतिम मुदतवाढ देऊन संधी द्यावी अन्यथा सर्वसामान्य माणसाने हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केलेला हा जीवाचा आटापिटा मातीमोल होणार नाही यासाठी संभाजी आरमारला सनदशीर आंदोलन उभारावे लागेल असा इशारा संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, संघटक प्रकाश डांगे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, शहरप्रमुख शशिकांत शिंदे, जिल्हा संघटक संजय सरवदे, सचिव राहुल यमगर,  उपशहरप्रमुख सागर ढगे, संतोष कदम, विद्यार्थीप्रमुख सोमनाथ मस्के, प्रभागप्रमुख मल्लिकार्जुन पोतदार, संताजी जांभळे, एजाज नाईकवाडी, सुधाकर करणकोट, संगप्पा म्याकल आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts