भारत

गोळीबारात चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. 44 जागांसाठी हे मतदान होत असून मागील दोन टप्प्यांतील हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाची मोठी परीक्षा आहे. विविध जागांवर हिंसाचार टाळण्याचे सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान आहे. उत्तर बंगालमधील कूचबिहार, अलीपुरदवार तसेच दक्षिण 24 परगणा, हावडा व हुगली जिल्ह्यातील 44 जागांवर मतदान होत आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक 285 मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला. यामध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आनंद बर्मन नावाच्या तरुणाला बाहेर ओढत आणण्यात आलं आणि गोळी मारुन त्याची हत्या केली. घटनेच्या वेळी मतदान सुरू होतं. या घटनेनंतर भाजपा आणि तृणमूलच्या समर्थकांमध्ये झडप झाली. यात बॉम्बही फेकण्यात आल्याने अनेक लोक जखमी झाले. केंद्रीय दलांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. तरुणाच्या कुटुंबीयांनी तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप केला आहे.

Related posts