Blog

ऐतिहासिक वारसा उस्मानाबाद जिल्ह्याचा ; दुर्ग वैभव परंड्याचे.

परंडा प्रतिनिधी – रणजीत पाटील.

परंडा किल्ला
महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या भूमीत काही भरभक्कम किल्ले आजही उभे आहेत. त्यापैकी उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात असलेला परंडा किल्ला हा एक अप्रतीम भुईकोट आहे. हा प्राचीन किल्ला आजही चांगल्या अवस्थेत उभा आहे. यावर असणार्‍या विवीध तोफा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. परांडा या तालुक्याच्या गावात हा किल्ला असल्यामुळे फारसे श्रम न करता हा सुंदर किल्ला पाहाता येतो.

==========================================================================================

किल्याचा प्रकार: भुईकोट
चढाई श्रेणी: सोपी
राज्य: महाराष्ट्र
जिल्हा: उस्मानाबाद
तालुका: परंडा

ऐतिहासिक पार्श्वभूमी :-

कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी ‘मुलुख मैदान तोफ’ होती.विजापूरच्या आदिल शहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली. यासोबतच किल्ल्यात अजदा पईकर नावाचीही तोफ आहे. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिह मंदिर तसेच एक मशिद आहे. परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यामध्ये अष्टकोनी आकाराची सुंदर विहीर आहे.

हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगर च्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगर च्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली.काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला त्याब्यात होता.

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील त्याच नावाच्या तालुक्याचे व इतिहासप्रसिद्ध किल्ल्याचे ठिकाण परंडा.बार्शीच्या पश्चिमेस सु. २७ किमी.वर सीना व तिच्या उपनद्यांदरम्यान ते वसले आहे. पुराणात याचा उल्लेख परमधामपूर या नावाने आढळतो. पुढे त्यास प्रचंडपूर म्हणू लागले आणि त्यानंतर परांडा हे नाव रूढ झाले. येथे नगरपालिका असून सर्व तहसील कार्यालये आहेत. गावाच्या मध्यवस्तीत परांडा हा भुईकोट किल्ला आहे. त्याच्याभोवती खंदक आहे आणि २६ बुरूजांच्या तटांच्या आत काही वास्तू व एक मशीद आहे. या मशिदीच्या मागे बऱ्याच अंतरावर एका तळघरात काही वीरगळ व शिल्पे आहेत. तसेच मशिदीचे स्तंभ व तीवरील जाळीकाम मुसलमानपूर्व काळातील हिंदू मंदिरांची शैली सूचित करतात.

हेमाद्रीने आपल्याचतुर्वर्गचिंतामणि ग्रंथातील व्रतखंडाच्या प्रस्तावनेत यादव घराण्यातील भिल्लम राजाने प्रत्यंडकाच्या राजाला जिंकले, असे म्हटले आहे. हे प्रत्यंकड म्हणजेच परंडा असावा. परमानंद कवीच्या श्रीशिवभारत काव्यात त्याचा निर्देश प्रचंडपूर म्हणून केलेला आढळतो. बहमनी सुलतानांपैकी दुसरा महंमूदशाह याच्या महमूद गावान या मुख्यमंत्र्याने तो बांधला असावा असे एक मत आहे, तर तो महमूद ख्बाजा गावान याने बांधला असावा, असे दुसरे मत आहे. बहमनी सत्तेच्या -हासानंतर तो अहमदनगरच्या निजामशाही सत्तेखाली आला. निजामशाहीत या किल्ल्यास अधिक महत्त्व प्राप्त झाले.

या किल्ल्यावर असणार्‍या विविध तोफा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. परंडा या तालु असल्यामुळे फारसे श्रम न करत किल्ल्यावर इतिहास प्रसिध्द मुलुख मैदान नावाची लांब पल्ल्याची तोफ आहे. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिह मंदिर तसेच एक मशिद आहे.आजघडीला सर्वात जुना दस्ताऐवज परंडा किल्ल्यातीलच असल्याचे पुरातत्त्व खात्यानेदेखील मान्य केलेले आहे. किल्ल्यामधील महादेवाचे मंदिर आणि मशीदिची दिवाबत्ती होत रहावी म्हणून निजाम सरकारने १२५ हेक्टर जमिनी इनामी दिल्या होत्या.महाराष्ट्रातील अनेक किल्ले रेखीव शिल्पसौंदर्याने नटलेले आहेत. स्वराज्यावर केलेल्या आक्रमणात अनेक मंदिरं आणि शिल्पं उद्ध्वस्त झाली असली तरी मराठ्यांनी वेळीच हे आक्रमण थोपवल्याने बरीच मंदिरं आणि शिल्पं टिकली. परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत. चांगल्या बांधणीचा हा किल्ला पडझड झालेल्या ठिकाणी डागडुजी करून पुनर्जीवित होत पहात आहे.

परंडा किल्ला हा भूदुर्गा मधील एक उत्कृष्ट नमुना आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी आहे. संपूर्ण किल्ल्याच्या सभोवती खंदक खोदलेला आहे. गडाच्या ईशान्य दिशेला प्रवेश करण्यासाठी पूल बांधलेला आहे. वेळप्रसंगी तो काढूनही ठेवता येईल अशी सोय केलेली आहे. गडाचे पहिले प्रवेशव्दार खूप भव्य आहे. त्याची लाकडी दारे आजही टिकून आहेत. पूलावरुन चालत गेल्यावर थेट पहिल्या प्रवेशव्दारातच आपण शिरतो. पहिल्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डावीकडे वळल्यावर दुसरे प्रवेशव्दार लागते.

यातून आत शिरल्यावर आपण चारही बाजूंनी तटबुरुज वेढलेल्या जागेत येतो. बुरुजांमधून छोट्या छोट्या तोफा आपल्यावर नजर रोखून बसविलेल्या दिसतात. पहिल्या व दुसर्‍या दरवाजाच्या तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. पुढे उजवीकडच्या बाजूला किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे. यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठा बुरुज आडवा येतो. याला उजवीकडे वळसा घालून किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीमध्ये जाता येते. डावी कडे वळल्यावर तटबंदीच्या आडोशाला पहारेकर्‍यांसाठी देवड्या बांधलेल्या दिसतात. वाट उजवीकडे वळते तिथे किल्ल्याचा चौथा भव्य महाकाय असा दरवाजा आहे. देवड्र्‍यांच्या समोरच्या तटबंदीच्या बेचक्यातून वाट पुढे जाते ती थेट महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन जाते. या वाटेने जातांना आपल्या दोन्ही बाजूला ४० फुटांची तटबंदी लागते.

चौथ्या प्रवेशव्दाराची उंची जवळजवळ ४० ते ५० फुट असावी आणि बाजूला असणार्‍या बुरुजांची उंची तर जवळजवळ ६० फुट भरेल. दरवाज्याच्या समोर एक ५० फुट खोल अशी विहीर आहे. कमानीच्या समोरच एक महाकाय बुरुज आहे. त्यावर जवळजवळ २० फुट लांबीची तोफ आहे. येथे जाण्यासाठी दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे लागते. चौथ्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच एक मोठी मशिद आहे.
या मशिदीच्या वर जाण्यासाठी पायर्‍र्‍यांची व्यवस्था केलेली दिसते. मशीद पाहून पुन्हा दरवाज्यापाशी यायचे आणि उजवीकडे निघायचे. डावीकडे देवड्या लागतात. यात तीन तोफा ठेवलेल्या आहेत. त्याच्या मागे असणार्‍या खोलीत असंख्य तोफगोळे पडलेले दिसतात. देवड्याच्या समोरच एक खोली सारखा भाग आहे, यात गणपतीची ४ फुट उंचीची मूर्ती आहे. शिवाय आजुबाजुला ही काही मूर्ती विखुरलेल्या दिसतात. हे सर्व पाहून पुन्हा देवड्र्‍यांपाशी यायचं, येथून तटबंदीच्या वर चढायचे. वाटेतच एक महादेवाचे छोटेसे मंदिर लागते. याच्याच बाजूला एक पायर्‍र्‍यांची भली मोठी विहीर आहे. आता पुढचा प्रवास हा तटबंदीवरुन करायचा. तटबंदी मध्येच बुरुज, परत तटबंदी अशी ही सर्व वाट आहे. प्रत्येक बुरुजावर एक भलीमोठी तोफ आहे. यातील बर्‍याच तोफा पंचधातूच्या आहेत.

परंडाच्या तटबंदीवरुन फिरतांना या सर्व तोफा दिसतात. यापैकी काही तोफांची तोंडे मगरी सारखी आहेत. काहींची पाकळ्याच्या आकाराची आहेत. यामधील सर्वात मोठ्या तोफेची लांबी २० फुट आहे. मुख्य दरवाजाच्या वर वजनाने आणि आकाराने सर्वात मोठी तोफ आहे, जिचे नाव ‘मुलुख मैदान तोफ’ असे आहे. अनेक तोफांवर फारसी शिलालेख कोरलेले दिसतात. एकुणच किल्ल्याची दुहेरी तटबंदी, अभेद्य बुरुज, त्यावर असणार्‍या तोफा आणि किल्ल्या भोवतीचा खंदक यामुळे हा भुईकोट किल्ला अभेद्य बनला होता. संपूर्ण किल्ला फिरण्यास दोन तास लागतात.असा हा महाराष्ट्रातील एक मजबूत व बलशाली भूईकोट किल्ला.

पोहोचण्याच्या वाटा:-

परंडा हे तालुक्याचे ठिकाण आहे. ते उस्मानाबाद आणि सोलापूर यांच्या हद्‌दीवर येते. सोलापूरहून बार्शी मार्गे परंड्या यायला बर्‍याच एसटी बसेस आहेत. बार्शी – परंडा २७ किमी अंतर आहे. ट्रेनने यायचे असल्यास कुर्डुवाडी येथे उतरावे. कुर्डुवाडी ते परंडा अशी बससेवा दर अर्ध्यातासाला आहे. पूण्याहून भूमला जाणारी गाडी परंडाला जाते. परंडा गावातच किल्ला आहे.
राहाण्याची सोय :- परंडा शहरात राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : परंडा शहरात जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय : परंडा शहरात पिण्याच्या पाण्याची सोय होते.
जाण्यासाठी लागणारा वेळ कुर्डुवाडी ते परंडा प्रवासाला १ तास लागतो.
सध्य स्थितीला कोरोना पार्श्वभूमीवर हा किल्ला बंद आहे.

चला इतिहास लोकांपर्यंत पोहचवू या..!

Related posts