महाराष्ट्र

फोन टॅपिंगचे पुरावे घेऊन मी केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय-देवेंद्र फडणवीस

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई पोलीस दलात बदल्यांचं रॅकेट उघडकीस येऊन त्याचे सर्व पुरावे गुप्तचर विभागानं सादर करुनही मुख्यमंत्र्यांनी त्यावर अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन आज दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
फडणवीस यांनी यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर पोलीस दलातील अनागोंदीवरुन जोरदार आरोप केले. “पोलीस दलात बदल्यांचं खूप मोठं रॅकेट असून यात अनेक अधिकारी देखील सामील असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत अनेक सबळ पुरावे गोळा केले होते आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांसोबतच मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. पण त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई का केली नाही?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
केंद्रीय गृहसचिवांना भेटणार
“पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक बडे अधिकारी आणि काही राजकारण्यांचीही नावं आहेत. त्यामुळे या चौकशी अहवालातील तब्बल ६ जीबीचे कॉल रेकॉर्ड्स पुरावे म्हणून सादरही करण्यात आले होते. पण ते अतिशय संवेदनशील असल्यानं सार्वजनिक करणं योग्य होणार नाही. या संदर्भात मी आता केंद्रीय गृहसचिवांची भेटीची वेळ मागितली आहे आणि त्यानुसार आज दिल्लीत मी त्यांना भेटून हे सर्व पुरावे त्यांच्यासमोर सादर करणार आहे”, असं फडणवीस म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील गृहसचिवांकडे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

Related posts