महाराष्ट्र

मी कुणाचे पाय चाटले नाहीत, ना हांजीहांजी केली,

मुंबई – जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील नेतृत्वाचा वाद नवा नाही. त्यातच एकनाथ खडसेंनीभाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आता महाजनविरुद्ध खडसे असं राजकीय वाद जिल्ह्यात अनेकदा पाहायला मिळतो. जळगावात गेल्या काही दिवसांपासून एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपवरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपल्याचं दिसून येते. (Political dispute between BJP Girish Mahajan and NCP Eknath Khadse)
एका तरुणाने एकनाथ खडसेंना फोन करून पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती. जामनेर तालुक्यातील वडगाव गावातील हा तरूण होता. त्यावर खडसेंनी तुमचे आमदार गिरीश काय करतात? इकडे तिकडे बायकांच्या मागे फिरतो का? त्यावर तरूणाने ते फोन उचलत नाही असं सांगितलं तेव्हा खडसेंनी तो फक्त पोरींचे फोन उचलतो असा टोला लगावला होता. ही ऑडिओ क्लीप जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर एका पत्रकाराने या ऑडिओची पुष्टी करण्यासाठी एकनाथ खडसेंना फोन केला तेव्हा तो ऑडिओ माझाच असल्याचं खडसेंनी स्पष्ट केले.
या ऑडिओ क्लीपवर उत्तर देताना गिरीश महाजनांनीही खडसेंना फटकारलं आहे. गिरीश महाजन म्हणतात की, मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असलेल्या व्यक्तीनं एका शाळकरी मुलाशी कसं बोलायला हवं? याचे भानही राहिलेले नाही. किमान त्याचा विचार तरी व्हायला हवा होता. एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त झालेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे मला आता त्यात लक्ष घालावचं लागेल. खडसेंचा इलाज मलाच करावा लागेल असं महाजनांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाजनांच्या या वक्तव्यानंतर खडसेंनी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांचा समाचार घेतला.
गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील लोकांनी गेल्या महिनाभरापासून माझ्याकडे तक्रार केली. पिण्याचं पाणी नाही, हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होत नाही. आपली जबाबदारी सोडून तीन तीन आठवडे पश्चिम बंगालमध्ये प्रचार करायला जाणं कितपत योग्य आहे का? माझं संतुलन बिघडलं असं म्हणतात, मी ठणठणीत आहे खात्री करायची असेल तर येऊन बघावं. मला सगळं माहिती आहे. १९९४ च्या फर्दापूरच्या भानगडीपासून सगळं माहिती आहे. मी वैयक्तिक कमेंट केली नाही. मतदारसंघातील लोकांचा संताप आहे असा इशाराही एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना दिला आहे.
गिरीशभाऊला मीच राजकारणात आणलंय, मी आर्थिक मदत केलीय, प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरलोय. म्हणून ते आजा याठिकाणी दिसत आहेत. माझा दोष एवढाच आहे की, मी कधी कुणाचे पाय चाटले नाहीत, कुणाची हांजीहांजी केली नाही, ती मला सवयही नाही. आपण अनेकांना घडवतो, अनेक लोकं प्रामाणिक राहतात, अनेकजण राहात नाहीत, असे म्हणत गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसेंनी पलटवार केलाय.

Related posts