अक्कलकोट

निवडणूक बिनविरोध करा आणि १५ लाख विकास निधी मिळवा – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – अक्कलकोट तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणूक होणार आहेत.सध्याच्या कोरोनाच्या प्राप्त परिस्थितीत निवडणूका या घेतल्यास साथ ही वाढू शकते.त्यामुळे आपल्या गावाची ग्रामपंचायत गावकरी मंडळींनी चर्चा करून बिनविरोध करा आणि आपल्या गावच्या विकासासाठी १५ लाखांचा निधी मिळवा असे आवाहन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे.

२०२० मध्ये राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका हा लोकशाहीचा सर्वात मोठा पाया असतो. जर या निवडणुका सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्या तर ती लोकशाहीसाठी चांगली बाब असतेच, शिवाय त्यातून गावाचा एकोपा दिसतो आणि जिथे एकोपा असतो तिथे विकास होण्यास हातभार लागतो.
सध्या सुरू असणारे कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. निवडणुकांमुळे कोरोना फैलावू शकतो याची शक्यता लक्षात घेऊन आमदार कल्याणशेट्टी यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आहे. कृपया आपण सर्वजण एकत्रित येऊन यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पाडून एक नवा पायंडा सुरू करूया.

यामुळे कोरोनापासून वाचण्यास मदत होईलच, शिवाय प्रशासनावर येणारा ताण कमी होईल आणि निवडणूक खर्चाची बचत सुद्धा होईल.अक्कलकोट मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडतील त्या गावांना मी १५ लाख रूपयांचा विकास निधी उपलब्ध करून देणार आहे.या निधीमधून गावाच्या विकासासाठी भरीव योगदान मिळेल आणि अनेक विकासकामे मार्गी लागतील,असेही ते यावेळी म्हणाले.

Related posts