पंढरपूर

यात्रा अनुदानातून पंढरपुरातील मालमत्ता धारकांचा पालिका कर माफ करा :: दिलीप धोत्रे

प्रदक्षिणामार्ग रस्त्यासाठी मनसे राज्य शासनाकडे करेल पाठपुरावा

पंढरपूर (प्रतिनिधी )

पंढरपूर नगरपालिका यात्रा अनुदानामधून नगरप्रदक्षिणा मार्गावर रस्ता करण्याचे नियोजन करीत आहे. यात्रा अनुदानातून रस्ता करण्यापेक्षा पंढरपूर शहरातील मालमत्ता धारकांचा वार्षिक पालिका कर हा माफ करावा. रस्त्यासाठी राज्य शासनाकडून निधी घ्यावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा शाडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

पंढरपूर मध्ये आषाढी, कार्तिकी , चैत्री , आणि माघी अशा चार मोठ्या यात्रा भरतात. या यात्रांमध्ये कोट्यावधी भाविक पंढरपुरात येत असतात. या भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रतिवर्षी पाच कोटी रुपयांचे पंढरपूर नगरपरिषदेस अनुदान प्राप्त होते. यंदाही पाच कोटी रुपयांचे अनुदान नगरपालिकेला मिळाले आहे. यंदा अनुदान जरी मिळाले असले तरी कोरोनामुळे वर्षभरात कुठलीही यात्रा झाली नाही. त्यामुळे या अनुदानातील एकही रुपया खर्ची पडला नाही. असे असताना अनुदानापोटी आलेल्या पाच कोटी रकमेचा विनियोग नगरपालिका प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्यांसाठी करण्याचे नियोजन करीत आहे.

परंतु पालिकेने रस्त्यांसाठी अनुदानापोटीची पाच कोटी रक्कम खर्च करू नये. ऊलट शहरातील मालमत्ताधारकांचा नगरपालिका कर या रकमेतून माफ करावा. आणि राज्य शासनाकडून प्रदक्षणा मार्गावरील रस्त्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी करावी. कारण पंढरपूर राज्यातील मोठे तीर्थक्षेत्र असल्याने येथील विकासाकरता राज्य शासन कायमच मोठ्या प्रमाणावर निधी देत आले आहे. याचा फायदा पालिका प्रशासनाने उचलावा. असे आवाहनही यानिमित्ताने दिलीप धोत्रे यांनी केले आहे.

कोरोनामुळे कष्टकरी वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशातच मार्च अखेर पालिकेने कर वसुलीसाठी तगादा लावला आहे. ज्या पद्धतीने सातारा नगरपालिकेने तेथील नागरिकांचा कर माफ केला. अगदी त्याच पद्धतीने पंढरपूर नगरपरिषदेने यात्रा अनुदानातून पंढरपूर शहरातील मालमत्ता धारकांचा कर माफ करावा. यासाठी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्षांनी आयोजित करावी. जेणेकरून पंढरपुरातील जनतेचे कष्टकरी वर्गाचे संसार हे उभे करण्यासाठी पालिकेचा हातभार लागेल. यासाठी पालिकेच्या सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. वेळप्रसंगी मनसे शहरातील सर्व पक्षांचा पाठिंबा पालिकेला मिळवून देईल. असा विश्वासही याप्रसंगी धोत्रे यांनी व्यक्त केला.

पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावर सिमेंट रस्ता व्हावा. यासाठी आपण लवकरच मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची भेट घेणार आहोत. राज ठाकरे यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणीही मनसे करणार असल्याचे यानिमित्ताने दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

Related posts