कळंब

महसूलच्या कळंब शहरातील 296 व्यापाऱ्यांना अकृषी कर भरण्याच्या नोटिसा ; 7 दिवसाच्या आत कर न भरल्यास कारवाईचा इशारा

मात्र अवैध उत्खननापोटी कंत्राटदारांना कोटयवधी रुपये दंड ठोठावून 2 वर्ष होत आलेत तरी वसुली नाही

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब शहरातील रहिवासी भागात दुकान टाकून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना कळंब महसूल प्रशासनाने अ कृषी कर भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील तब्बल 296 दुकानदारांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत. 7 दिवसाच्या आत कर भरणा न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, असं नोटिसात नमूद करण्यात आलं आहे.

निवासी जागेचा व्यवसाय करण्यासाठी वापर करण्यात येत असल्याचा महसूल प्रशासनाला निदर्शनास आले. त्यासाठी कळंब तलाठीमार्फत सर्व्हे करण्यात आला. यामध्ये शहरातील एकूण 296 दुकान हे निवासी जागांवर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. त्यामुळे या व्यापाऱ्यांना आकृषी कर भरण्यासंबंधी नोटीस देण्यात आले आहेत. मात्र या नोटिसांमुळे व्यापऱ्यांमध्ये नाराजी आहे. शहरात अनेक ठिकाणी रहिवासी भागात नागरिकांनी आपल्या उदरनिर्वाहसाठी आपल्या राहत्या जागेत छोटे- मोठं व्यवसाय सुरू केला होता.

2020 वर्षात कोरोनाने देशातील अर्थकारणाचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊनमुळे छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात त्यांना धीर द्यायचं सोडून महसूल विभाग नियम सांगून कर वसूल करत आहे. म्हणून शहरातील व्यापऱ्यांमध्ये रोष आहे. एकीकडे तालुक्यात मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. लाखोंचा महसूल बुडवून वाळूचा अवैध मार्गाने व्यापार सुरू आहे. त्याकडे महसूल विभाग डोळेझाक करत आहे.

तसेच कळंब तालुक्यातून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर, कळंब-ढोकी, कळंब लातूर या रस्त्यांच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाचे परवानगी पेक्षा जास्त उत्खनन केले आहे. या अवैध उत्खननापोटी तिन्ही कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे दंड ठोठावून 2 वर्ष होत आलेत तरी एक रुपयांची दंडाची वसुली त्यांच्याकडून करण्यात आली नाही. मात्र छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांना 7 दिवसाच्या आत पैसे भरा म्हणून तंबी देण्यात आलीय. म्हणून मोठ्यांना वेगळा न्याय आणि छोट्यानं वेगळा का? अशी चर्चा शहरात सुरू आहे.

Related posts