महाराष्ट्र

आता व्हाईट फंगसचाही धोका!

ब्लॅग फंगसपेक्षाही अधिक संसर्गक्षमता

देशभरात कोरोना महामारीपाठोपाठ उद्भवलेल्या ब्लॅक फंगस (म्यूकर मायकॉसिस) आजाराने दहशत पसरवली असतानाच आता त्याहूनही अधिक संसर्गक्षमता असलेल्या व्हाईट फंगसचाही धोका निर्माण झाला आहे. बिहारच्या पाटण्यात व्हाईट फंगसचे चार रूग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे.
कोरोना की व्हाईट फंगस ओळखणे कठीण
व्हाईट फंगसची लक्षणं एचआरसीटीमध्ये कोरोनासारखीच दिसतात. त्यामुळे कोरोना की व्हाईट फंगस हे ओळखणं कठीण असतं. अशात रूग्णांची अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणीही निगेटिव्ह ठरते. त्यामुळे व्यक्तीच्या कफमधील फंगस कल्चर तपासणी होणं गरजेचं आहे.
कुणाला होऊ शकतो?
ऑक्सिजन पुरवठा होत असलेल्या कोरोना रूग्णांच्या फुफ्फुसांमध्ये हा संसर्ग होतो. तसंच औषधोपचार सुरू असलेल्या कॅन्सरच्या रूग्णांनाही हा संसर्ग होतो. नवजात बालकांमध्ये हा आजार डायपर कँडिसोसिसच्या रूपात होतो. यात क्रीम कलरचे किंवा पांढरे डाग दिसतात.
कुठे होऊ शकतो संसर्ग?
फुफ्फुस, त्वचा, नखे, तोंडाच्या आतील भाग, आंतडे, किडनी, गुप्तांग आणि मेंदू येथे संसर्ग पसरू शकतो.
व्हाईट फंगस होण्याची कारणे
व्हाईट फंगसची कारणं ब्लॅक फंगससारखीच आहेत. उदा. प्रतिकारक्षमता कमी असणं, मधुमेह, अँटिबायोटिक-स्टेरॉईड्सचे दीर्घकाळ सेवन इत्यादी कारणांमुळे हा संसर्ग होऊ शकतो.
उपाय काय?
जे रूग्ण ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर आहेत त्यांची उपकरणे विशेषतः ट्युब वगैरे जीवाणूमुक्त असावेत. ऑक्सिजन सिलिंडर ह्युमिडिफायरमध्ये स्ट्रेलाईज वॉटर वापरले पाहिजे. जो ऑक्सिजन रूग्णाला दिला जाणार आहे तो फंगसमुक्त असावा. कफमधील फंगसचीही तपासणी करायला हवी.

Related posts