पंढरपूर

पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा निधी मंजूर

सचिन झाडे –
पंढरपूर –

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून ‘मायक्रो फ्लुइडिक्स’ या विषयावरील स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर अंतर्गत असलेल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट अर्थात संशोधन विभागामार्फत आणि संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रणजित गिड्डे व प्रा. दिग्विजय रोंगे यांनी अनुक्रमे ‘लो कॉस्ट पी.डी.एम.एस.बेस्ड लेन्सेस युजिंग हॅगिंग ड्रॉपलेट्स’ व ‘ऑप्टीमल डिझाईन ऑफ मायक्रो काम्पोनेन्टस फॉर मायक्रो फ्लुइडिक अॅप्लिकेशन्स’ या विषयावर आपले संशोधन प्रस्ताव सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडे सादर केले होते. सदर प्रस्तावांना ‘पिअर रिविव्ह कमिटी’ कडून शिफारस मिळालेली असून त्यांना माननीय कुलगुरू महोदयांनीही मान्यता दिलेली आहे तसेच या दोन्ही प्रकल्पांच्या संशोधन निधीबाबतची पत्रे महाविद्यालयास प्राप्त झालेली आहेत.
डॉ.रणजित गिड्डे यांचा संशोधन प्रकल्प हा विविध क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या लेन्सेस च्या संदर्भातील आहे. स्मार्टफोन, वेब कॅम अशा उपकरणामधील प्रकाशाचे प्रदूषण थांबवणे व विजेची बचत करणे हे तसेच या व अशा इतर उपकरणांचा प्रभावी वापर करणे या संशोधनातून शक्य होणार आहे. प्रा. दिग्विजय रोंगे यांच्या संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून सूक्ष्म पातळीवर जाऊन अभ्यास करता येणारे असे मायक्रोफ्लुडीक डिव्हाइस तयार केले जाईल. अल्प कालावधीत रासायनिक संश्लेषण अचूकपणे पार पाडण्यासाठी हे डिव्हाइस कार्यशील असेल. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेह सारख्या पॅथॉलॉजीज तसेच पॉईंट-ऑफ-केअर टेस्टिंगमध्ये या डिव्हाइसची प्रोटोटाइप फायदेशीर ठरेल. अशा योजनांतर्गत निधी मिळविणारे महाराष्ट्रातील मोजक्या महाविद्यालयांपैकी स्वेरी चे हे महाविद्यालय आहे. ‘स्वेरी’मध्ये संशोधन विभागाची स्वतंत्र निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत जवळपास साडे सात कोटी पेक्षा जास्त निधी मिळाला आहे.

संशोधन निधी बाबतच्या या यशाबद्दल डॉ. रणजित गिड्डे व प्रा. दिग्विजय रोंगे यांचे व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Related posts