Blog

एस. टी. – आठवण लाल परीची…

आपली लाडकी लालपरी- - - -

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव 
सहशिक्षक - श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

================================================================================

मित्रांनो, एस टी चा प्रवास माहिती नाही असा एक ही व्यक्ती साधारणपणे सापडणार नाही! आपणा सर्वांची आवडती, तुमची, आमची ,लहानांची, मोठ्यांची, वृद्धांची, अत्यंत आवडती परी राणी म्हणजे आपली एस टी होय!! सर्वांनाच आनंद देणारी, आनंदी व सुरक्षित प्रवास करणारी, कोणाशी स्पर्धा नाही ,हा आपला एकच रस्ता धरून धावणारी. जीप, टेम्पो, ट्रक, टँकर, कितीही वेगाने पुढे गेली, तरीही आपला रस्ता व वेग न सोडणारी!

ही एसटी म्हणजे आपली सर्वांची खूपच जवळची, प्रिय आहे. पण आज हीच लालपरी आपल्याला दिसेनाशी झालेली आहे! गेले कित्येक दिवस बस स्टॉप सुने,सुने झाली आहेत. शहरे ओस पडल्यासारखी दिसत आहेत. गाव गाव उदास झाले आहे! सर्वात मोठा दीपावलीचा सण वीणा बसचा पार पडला. पाच दिवसाचा आनंदी आनंद शहरात गेलेला नोकर वर्ग आपापल्या गावाकडे दिवाळीसाठी येण्यास तयार झाला पण प्रवासासाठी एसटी कुठे आहे! एसटी बंद! संप! संप!! संप!!!

एसटी कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र काम करून तुटपुंजा पगार मिळतो. आजच्या या महागाईच्या काळात त्यांचे कुटुंब चालावे कसे? एवढा मोठा खर्च करावा कसा? हा त्यांच्या समोरील मोठा प्रश्न आहे. काहीजण दिवस पाळी व रात्र पाळी ही नोकरी करतात. खरंतर सरकारने त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्या मागण्या सरळ-सरळ मान्य करून त्यांचा पगार वाढवावा हा मूळ मुद्दा आहे. सर्वांनाच असे वाटते ते अगदी बरोबरच आहे. सरकार आणि हा कर्मचाऱ्यांचा संप बंद यामुळे सामान्य जनतेचे किती हाल होतात ते दिसत आहे! कर्मचारी, नोकरदार, कंपनी मध्ये काम करणारे, एवढेच नव्हे तर शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. अगोदरच कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद आहेत, त्यातच आता बस बंद झाल्यामुळे त्यांच्या परीक्षा व अभ्यास यावर परिणाम होताना दिसत आहे. बस बंद असल्यामुळे सर्व प्रवासी अडचणीत आले आहेत. खाजगी वाहतूक बोकाळलेली दिसत आहे! मनमानी तिकीट आकारणी करून सामान्य प्रवाशाला एक प्रकारे लुटण्याचे काम सुरू आहे !हे आपण सर्वजण पाहतच आहोत व अनुभव घेत आहोत. काही ठिकाणी तर बसस्थानकात खाजगी वाहनाने ताबा मिळवुन प्रवेश केलेला दिसत आहे.

एसटीचा प्रवास सुखाचा व आनंदाचा असतो. कितीही गर्दी असू द्या आपण एसटीची वाट पहात बसस्टॉपवर उभे राहतो. कुटुंबियांसोबत केलेला एसटीचा प्रवास खूप आनंददायी, सुखद व सुरक्षित असतो .एसटीच्या वेगवेगळ्या योजना मग त्या लहान बालकांसाठी असो, विद्यार्थ्यांसाठी असो , दिव्यांगासाठी असो, किंवा वृद्धांसाठी असो, किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असो या खूपच लाभदायी असतात! लक्ष लक्ष लोकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे .विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी 100% विश्वासाने एसटीच असायची. लहान मुलांची असो, अंगणवाडी बालवाडी प्राथमिक असो, किंवा माध्यमिक सहली असोत अथवा कॉलेजच्या सहली असोत, कुठल्याही सहलीसाठी आपली लाडकी एस टी चीच निवड होत असे! हे विशेष सांगावेसे वाटते.

ड्रायव्हर साहेब व कंडक्टर साहेब हे ही तितकेच विश्वासाने प्रवाशांना बोलत व माहिती सांगत असत. वृद्ध पुरुष व महिला, लहान मुले यांच्यासाठी जागा करून देत असत. रात्रीच्या वेळी तर बसमधील लायटिंग सर्वांचे मन आकर्षित करून घेत असे. त्याच बरोबर ड्रायव्हर व कंडक्टर चे घंटी द्वारे केलेली सूचना आश्चर्यचकित करीत असे. बस मध्ये खूप काही सूचना लिहिलेल्या असायच्या ज्या आपण सर्वांनी वाचलेल्या आहेत. उदाहरणार्थ तिकीट काढूनच बस मध्ये बसा, चिल्लर मोजके पैसे द्या, संगीत व वाद्य वाजविण्यास सक्त मनाई आहे, धूम्रपान करू नये, खिडकीतून हात बाहेर काढू नये, चालत्या गाडीतून उतरून नये! इत्यादी इत्यादी. कधीकधी सर्वांनी मिळून बसला ढकलून चालू करण्याचा आनंदही आपण घेतला आहे! आठवा तो काळ प्रथम एसटी आपल्या गावाला आली होती. साधारणपणे 1970 ते 1980 चा काळ आठवा. ज्यावेळी रस्ते नुकतेच तयार होत होते, तयार झाले होते, आणि तशा रस्त्याने लाल रंगाची ही देखणी एसटी पहिल्यांदा आपल्या गावाला आली होती. गावातील चौकात येऊन मारुतीच्या मंदिराला फेरी घालून आपली सर्वांची वाट बघत उभी होती! त्यावेळी तिला बघण्यासाठी उसळलेली लोकांची गर्दी! सर्व गावकरी मंडळी तसेच गावाचे सरपंच यांनी केलेला त्यांचा स्वागत सत्कार! सकाळी एक फेरी व संध्याकाळी एक फेरी असे तिचे वेळापत्रक असायचे व त्या वेळी ज्यानी एसटीचा प्रवास केला ते किती भाग्यशाली होते. ज्या काळात सायकल व बैलगाडीचा प्रवास होता किंवा पायी चालणे किंवा बैल, घोडा यावरून प्रवास केला जायचा अशा काळात अचानक एसटीने प्रवेश केला! आणि सर्व जनता चकित झाली किती आनंद, किती आश्चर्य, किती कौतुक त्या ड्रायव्हर साहेब व कंडक्टर साहेबांचे. कमीत कमी माफक, योग्य दरात भरपूर प्रवास असा होता, जो सर्वसामान्यांना परवडेल व झेपेल. साधारणपणे वीस किलोमीटर प्रवासाला 50 ते 60 पैसे तिकीट असायचे!(अंदाजे) आणि त्या काळी खाजगी वाहन कुठेच दिसत नसे. म्हणून एसटीला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते.

सुरक्षित प्रवास, माफक तिकीट दर, यामुळे एसटी लवकरच सर्वांची खूप आवडती झाली, प्रिय झाली व सर्वांची जीवनवाहिनी बनली! गावोगाव एसटीची सुरुवात झाल्यामुळे तालुक्यातील, जिल्ह्यातील ,सर्व गावे एकमेकांना जोडली गेली. लोकांची ये-जा प्रवास वाढला, आवक-जावक सुरू झाली. तसेच दूध ,भाजीपाला ,फळे व वर्तमान पत्रे, पोस्टाचे पार्सल एसटीने गावोगावी पोहोचू लागले. एसटीच्या सुविधांमुळे लोकांची सर्व कामे वेळच्या वेळी होऊ लागली. नंतर शाळा कॉलेज साठी मुलांची विद्यार्थ्यांची संख्या वाढली. योग्य दरात एसटीचा पास मिळू लागला. व्यवहार सुरळीत सुरू झाला. मग गावचा बाजार असेल, गावाची जत्रा असेल, अशावेळी जादा बसगाड्या येऊ लागल्या व जनतेची सोय होऊ लागली. या सर्व बाबींमुळे लालपरी लाडाची, आवडीची विश्वासू व जनतेची जीवनवाहिनी बनली. ती आजतागायत तशीच आहे. विश्वासू, सुखदायी, आनंदी. आठवतो तो बाजारचा दिवस एसटी खचाखच भरलेली, जागा पकडण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडालेली, कोणी खिडकीतून प्रवेश करीत आहे, कोणी केबिन मधून तर कोणी पाठीमागील खिडकीतून आत प्रवेश करून जागा पकडीत आहे. त्यावेळी खिडकीतून रुमाल किंवा बॅग टाकून जागा धरण्याची पद्धत होती. त्यासाठी हमरा तुमरी व्हायची आणि जागा पकडायचा आनंद, रुबाब काही औरच असायचा. हीच लालपरी एसटी .

आज दहा ते पंधरा दिवसापासून कडेकोट पणे बंद आहे. त्यामुळे लोकांना प्रवासासाठी खूप खूप त्रास होत आहे .अडचणी निर्माण होत आहेत. तरी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा व लवकरात लवकर एसटी सुरू करावी व जनतेचे हाल थांबवावे हीच अपेक्षा.

 

Related posts