Blog

समर्थ शिष्योत्तम – कल्याणस्वामी राम मंदिर व कल्याणसागर जलाशय

परंडा प्रतिनिधी:-रणजीत पाटील

परंडा तालुक्यातील डोमगाव येथे रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलाशयाला कल्याणसागर असे मन्हतात जवळच सोनारी येथे कालभैरवाचे प्राचीन व प्रशिद्धा मंदिर आहे.
डोमगाव मठातील श्री कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोधाची प्रत. याच दासबोधावरून श्री शंकर श्रीकृष्ण देवांनी दासबोध प्रसिद्ध केला.
कल्याण स्वामी (मराठी लेखनभेद: कल्याणस्वामी)), पूर्ण नाव : अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी; जन्म : बाभुळगांव येथे (शा.श. १५५८ ), अर्थात इ.स. १६३६… समाधी इ.स.१७१४; डोमगाव, परंडा तालुका,उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र).
हे स्वतः योगी व समर्थ रामदासांचे शिष्य होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

बालपण व प्रारंभिक जीवन

पाराजीपंतानी आपली बहीण व तिच्या मुलांसह समर्थांचा अनुग्रह घेतला.
मूळच्या नाशिक परिसरातील कृष्णाजीपंत कुलकर्णी हे पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तीर्थयात्रेसाठी कोल्हापूरला आले होते. तेथे पाराजीपंत (बरवाजीपंत) कुलकर्णी यांच्या रखुमाबाई नावाच्या बहिणीशी कृष्णाजीपंतांचा विवाह झाला. त्यांना ३ मुले झाली. पहिला म्हणजे, अंबाजी (जन्म शा.श. १५५८ म्हणजे इ.स. १६३६) व दुसरा दत्तात्रेय. या दोघांना एक बहीणही होती. रामदासस्वामी कीर्तनासाठी कोल्हापूरला आले असता पाराजीपंतानी आपली बहीण व तिच्या मुलांसह समर्थांचा अनुग्रह घेतला. त्यानंतर अंबाजी, दत्तात्रेय व त्यांच्या मातोश्री, समर्थांबरोबर तीर्थयात्रेस निघाले. वाटेत शिरगाव येथे समर्थांनी दत्तात्रेय स्वामींना मठ स्थापून दिला. ते व त्यांच्या मातोश्री तेथेच राहिले. अंबाजी मात्र पुढे आजन्म समर्थसेवेत राहिले. अंबाजींचेच नाव पुढे समर्थांनी कल्याण असे ठेवले.

अंबाजीने फांदी तोडली

सन १६४८ ते सन १६७८पर्यंत कल्याणस्वामी हे समर्थ रामदास स्वामी यांच्या बरोबर होते. रामदास स्वामींनी कल्याण स्वामींच्या शिष्यत्वाच्या अनेक परीक्षा घेतल्या. त्या सर्व परीक्षांमध्ये ते पूर्णपणे उत्तीर्ण झाले. रामनवमीच्या रथयात्रेत रामाचा रथ आडव्या आलेल्या एका झाडाच्या फांदीमुळे अडला. तेव्हा रामदासांनी ती फांदी तोडण्याची आज्ञा केली. परंतु ती फांदी जो तोडेल तो तिच्या खाली असलेल्या खोल विहिरीत पडेल, अशी परिस्थिती होती. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता अंबाजीने ती फांदी तोडली व ते विहिरीत पडले, आणि रथ पुढे गेला. संध्याकाळी सर्व शिष्यांना अंबाजीची आठवण झाली. इतक्या वेळ पाण्यात राहिल्याने अंबाजी मृत झाले की काय अशी भीती सर्व शिष्यांना होती. ते समर्थांना घेऊन त्या विहिरीजवळ आले. समर्थांनी अंबाजीला विचारले ‘अंबाजी, कल्याण आहे ना ?’ तेव्हा आत पाण्यातून उत्तर आले ‘स्वामी, आपल्या कृपेने कल्याण आहे’. तेव्हापासून अंबाजी हे कल्याण स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. ही घटना मसूर येथे घडली.

समर्थांनी चोरांचे हृदयपरिवर्तन केले

एकदा चाफळला रात्री समर्थ अंथरुणात पहुडले होते.त्यांचा लाडका शिष्य कल्याण त्यांचे पाय चेपत होता.रात्रीचे जवळजवळ साडे बारा वाजले होते.पाय चेपताना कल्याण स्वामीना शंका आली कि, भांडार घरात चोर शिरले असावेत.
कल्याणस्वामींचे अर्धे लक्ष पाय दाबण्याकडे तर अर्धे लक्ष चोरांकडे होते.कल्याणने जेव्हा समर्थांना चोर आले असावेत असे सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले – ‘अरे जाऊ दे, भांडारघरातील धान्य आपल्या एकट्याचे थोडेच आहे.त्या अन्नावर जर त्यांचे नाव लिहिले असेल तर ते त्यांना मिळेल.’कल्याणने जेव्हा भांडारघरात भिक्षेचे पैसे आहेत म्हणून सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले – ‘अरे जाऊदे आपण साधू आहोत. आपल्याला पैशाचा मोह काय करायचा?’समर्थ तसे पक्के व्यवहारी होते.पण मुद्दाम कल्याणाची परीक्षा पाहण्यासाठी ते तसे बोलत होते.म्हणून कल्याण म्हणाला – ‘लोकांपुढे चुकीचा आदर्श ठेवल्यासारखा होईल.’आपला शिष्य वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेला पाहून समर्थांना कौतुक वाटले .समर्थांनी कल्याणास त्या चोरांना भांडारघरात कोंडून ठेवायला सांगितले. कल्याण अत्यंत बलदंड होते.भलीमोठी काठी हातात घेऊन ते भांडारघरात शिरले. कल्याणांचा रुद्रावतार पाहून सारे चोर घाबरले. समर्थदेखील त्या ठिकाणी पोहोचले.
समर्थ त्या चोरांशी अत्यंत प्रेमाने बोलले. समर्थ म्हणाले, – ‘तुम्हाल मी भांडारघरात काम दिले आणि पगार दिला तर तुम्ही चोरी बंद कराल का?’ तेव्हा सारे चोर म्हणाले, ‘कष्ट करून आमचा संसार चालणार असेल तर आम्ही या क्षणापासून चोरीचा व्यवसाय सोडून देऊ.समर्थांनी त्या सर्वांना चाफळ मठात वेगवेगळी कामे दिली.त्यामुळे त्या चोरांनी समर्थांच्या मठात नवे जीवन सुरु केले.
समर्थ रामदासस्वामींनी एकदा ब्रह्मपिशाच्चाचे सोंग घेतले. तेव्हा कल्याण स्वामींनी त्यांची प्रार्थना करून त्यांना शांत केले. ते ठिकाण सज्जनगडावर ‘ब्रह्मपिसा’ या नावाने ओळखले जाते.

समर्थांनी शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी मध्यरात्री विड्याची पाने आणण्याची आज्ञा केली

समर्थांनी शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी एकदा मध्यरात्री विड्याची पाने आणण्याची आज्ञा केली. पण भर रात्री पाने आणायला कोणीही तयार झाले नाही. यावेळी कल्याण स्वामी तत्काळ निघाले, परंतु जंगलातून जात असताना त्यांना एका विषारी नागाने दंश केला. कल्याण स्वामी मूर्च्छित झाले.बराच वेळ ते का आले नाहीत हे पाहण्यासाठी समर्थ आले असता त्यांना रस्त्यात मूर्च्छित कल्याण स्वामी दिसले. नंतर समर्थांनी त्यांचे विष उतरवले. अशी कल्याणांची गुरुनिष्ठा होती.
एकदा औरंगाबादला समर्थ रामदास स्वामी कीर्तन करत होते.त्यावेळी कल्याण स्वामी त्यांच्या साथीला होते. समर्थांनी अभंग सांगण्यासाठी त्यांच्याकडे पहिले.पण कल्याण स्वामींना अभंग आठवला नाही.यावेळी समर्थांनी त्यांना हातातील टाळ फेकून मारला .तो कल्याण स्वामींच्या डोक्याला लागला व रक्ताची धार लागली.त्याच्यानंतर कल्याण स्वामींना तो अभंग आठवला.नंतर समर्थांनी स्वहस्ते ती जखम भरली.व पुढे समर्थ म्हणत .. आम्ही रांधतो ते सेवुनी । अवशिष्ट देतो मज काढुनी॥
अशा अनेक बोधप्रद कथा समर्थ चरित्रात आहेत.

समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर असताना कल्याणस्वामी रोज त्यांच्या स्नानासाठी ‘उरमोडी’ नदीतून पाण्याने भरलेले हंडे सज्जनगडावर घेऊन येत असत. हे हंडे आजही तेथे पहायला मिळतात.या ३० वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी समर्थांचे सर्व साहित्य लिहून दिले. ते समर्थांना कीर्तनामध्ये साथ करत असत. तसेच त्यांच्या बरोबर सर्वत्र भ्रमण करत असत. समर्थ रामदासांनी त्यांना समाधिअवस्थेची अनुभूती दिली होती. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या शिवथर घळ या ठिकाणी समर्थ रामदासांनी त्यांच्याकडून आपला दासबोध हा ग्रंथ लिहून घेतला. रामदासांनी कल्याणस्वामींना दासबोधाचे तात्त्विक सारही सांगितले; ते सोलीव सुख या नावाने प्रसिद्ध आहे. सध्या समर्थांचे जे काही साहित्य उपलब्ध आहे, त्याचे बहुतेक लिखाण कल्याणस्वामींच्या लेखणीतून झाले आहे. कल्याणस्वामींचे गुरुबंधू अनंत कवी लिहितात : “स्वामींचा कवितासमुद्र अवघा कल्याण लिहितसे ।”
सन १६७८ मध्ये समर्थ रामदासांनी कल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली.

जेव्हा समर्थ रामदास स्वामींनी १६८१ मध्ये समाधी घेतली, त्यावेळी कल्याणस्वामी डोमगावला होते. गुरूंच्या विरहाने व्याकुळ होऊन ते सज्जनगडावर गेले, तेव्हा समाधी दुभंगून समर्थांनी त्यांना दर्शन दिले. त्याची प्रसंगाची खूण म्हणून समर्थांच्या समाधीवरील ‘चीर’ दाखवतात. त्यानंतर मात्र कल्याण स्वामी सज्जन गडावर कधीही गेले नाहीत. कारण त्यांना संपूर्ण सज्जनगडच समर्थरूप भासत होता. सन १६८१मध्ये रामदासस्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या अस्थी चाफळ येथील वृंदावनामध्ये ठेवण्यात आल्या. त्यांची पूजाअर्चा कल्याणस्वामींचे शिष्य, केशवस्वामी हे करत असत. सन १७१४मध्ये केशवस्वामींनी समर्थांच्या अस्थी वृंदावनामधून बाहेर काढल्या असतां, योगबलाने कल्याणस्वामींनी परांडा येथे आपला देह ठेवला. गुरुशिष्य (समर्थ रामदासस्वामी व कल्याणस्वामी) या दोघांच्या अस्थी केशवस्वामींनी गंगेमध्ये एकत्र विसर्जित केल्या .ही गुरुनिष्ठा पाहून केशव स्वामींनी खालील उद्गार काढले:
धन्य धन्य हे गुरुशिष्यपण । धन्य धन्य हे सेवाविधान । धन्य धन्य अभेदलक्षण । धन्य धन्य लीला अगाध ॥
श्री कल्याणस्वामींनी त्यांचे सर्व जीवन समर्थसेवेत अर्पण केले होते.

कल्याणस्वामींचे हस्ताक्षर अतिशय वळणदार होते. त्यांच्या हातचे २५० पानांचे बाड धुळे येथे आहे. ते रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत, त्यामुळे त्यांची शरीरयष्टी अत्यंत बलदंड होती. नदीच्या पुरामध्ये उडी घेणे, सज्जनगडावरून खाली झेप घेणे अशी कामे ते लीलया करू शकत. त्यांची वस्त्रे हुर्मुजी (भगव्या) रंगाची असत .ते कौपीन परिधान करत. ते रुद्राक्षमाळा, यज्ञोपवीत, मुद्रिका, दाढी व जटा इत्यादी धारण करत असत. ते सर्वांगाला भस्म लावत. ते पातंजल योगामध्ये अधिकार असलेले योगी होते. कल्याणस्वामींना ‘योगिराज’ उपाधीने संबोधले जाते. त्यामुळेच त्यांचे चित्र योगमुद्रेमध्ये बसलेल्या स्थितीमध्ये आहे. त्यांच्या चित्रामध्ये त्यांनी पायाला ‘योगपट्ट’ बांधलेला दिसतो. कल्याण स्वामी हे चांगले चित्रकार होते. त्यांनी रेखाटलेले वीर मारुतीचे चित्र उपलब्ध आहे. समर्थांचे शिष्य किती विविध विषयांमध्ये निपुण होते याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे हे चित्र होय. त्यांच्याकडे असलेली झोळी ‘गोणी (पोत्या) एवढी’ मोठी असे. त्यामध्ये लेखन साहित्य, संदर्भ ग्रंथ इत्यादी गोष्टी असत. एका दिवसामध्ये ते शेकडो ओव्या लिहून काढत. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या भागात कल्याणस्वामींनी २५०पेक्षा अधिक रामदासी मठांची स्थापना केली आहे. ते उत्तम कीर्तनकार होते. वळणदार अक्षर, उत्तम पाठांतर, तेजःपुंज शरीरयष्टी, प्रतिभावंत कवी, योगी व एकनिष्ठ गुरुभक्त इत्यादी गुण आपणास कल्याणस्वामींमध्ये आढळतात.

साहित्य रचना

कल्याणस्वामीनी ७०० ओव्यांचे महावाक्य पंचीकरण हे प्रकरण आणि ध्रुवाख्यान(१४), श्रीरामदास(८), रुक्मिणीस्वयंवर(हिंदी-३४), श्रीशुकाख्यान(१८), संतमाळा(१०), सोलीवसुख(५०अभंग)व आणखी सहा प्रकरणे रचली आहेत. याशिवाय, ५ श्लोक, ८ आरत्या,९७ पदे, ३ भूपाळ्या आणि ८२ चौचरणी ओव्या रचल्या आहेत. 
कल्याणस्वामीची समाधी डोमगाव, परांडा तालुका उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र
सज्जनगडाहून निघाल्यावर कल्याण स्वामी शिरगाव,पंढरपूर,तुळजापूर या मार्गे डोमगावला आले. डोमगाव येथे आल्यावर स्वामींनी रामदासी कार्यास सुरुवात केली.वर्षातील ४ महिने डोमगाव ,४ महिने डोणजे व ४ महिने डोमगाव येथील कडा येथे त्यांचे वास्तव्य असे.सन १६७८ ते सन १७१४ पर्यंत कल्याणस्वामी डोमगाव येथे होते. या भागात त्यांनी विपुल प्रमाणात शिष्यवर्ग निर्माण केला. त्यांच्या ४४ शिष्यांची यादी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या परांडा नामक गावी रामकथा संपूर्ण सांगून झाल्यावर आषाढ शुद्ध त्रयोदशी, शा.श. १६३६(इसवी सन १७१४) रोजी कल्याणस्वामींनी देह ठेवला. त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यसंस्कार डोमगाव येथे झाले. सीना नदीकाठी असलेल्या डोमगावच्या या समाधिस्थळी सुमारे २५० वर्षे जुने असलेले कल्याणस्वामी समाधिमंदिर आहे. डोमगाव मधून वाहणाऱ्या सीना नदीचे कल्याण स्वामींनी ‘श्रमहरणी’ असे नामकरण करून तिची आरतीही रचली आहे.वर्तमान समाधिमंदिर हे त्यांचे उत्तराधिकारी श्री मुद्गल स्वामींच्या काळात, म्हणजे कल्याणस्वामी समाधिस्थ झाल्यानंतर ५९ वर्षांनंतर बांधले गेले.या मंदिरामध्ये ४ शिलालेख आहेत . मंदिरामधील भव्य लाकडी सभामंडप मठपती श्रीरामबुवा यांनी सन १९१४ ते १९१८ या कालावधीमध्ये बांधला. कल्याणस्वामींची समाधी ही वालुकामय पाषाणाची आहे. या समाधिमंदिरात, जसा समर्थ रामदासस्वामींनी सांगितला व कल्याणस्वामींनी लिहून घेतला, अशा त्या दासबोधाची आद्य हस्तलिखित प्रत, कल्याणस्वामींची जपमाळ इत्यादी स्मृतिवस्तू ठेवल्या आहेत. दरवर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीला कल्याणस्वामींची पुण्यतिथी असते .

डोमगाव मठ परंपरेमध्ये पुढे सखाराम महाराज नावाचे सत्पुरुष होऊन गेले. रामदास>कल्य़ाण>मुद्गल>भिवाजी>महारुद्र>हनुमंत>सखाराम अशी त्यांची शिष्यपरंपरा आहे. त्यांनी कीर्तनांद्वारे रामदासी संप्रदायाचा प्रसार केला. संकेत कुबडी, लघुवाक्यवृत्ती इत्यादी ग्रंथांचे कर्ते हंसराजस्वामी हे यांचे जवळचे स्नेही होते. श्री सखाराम महाराज यांचा समाधीकाळ सन १८४०आहे. त्यांची समाधी हैदराबाद येथे आहे. तसेच पुढे शंकराचार्य झालेले कल्याणसेवक महाराज तरुणपणी डोमगाव येथे साधनेसाठी राहिले होते. थोर समर्थभक्त अण्णाबुवा कालगावकर यांनी डोमगाव येथेच साधना करून साक्षात्कार करून घेतला. तसेच श्रीधर स्वामी यांच्या आई-वडिलांनी कल्याण स्वामी परंपरेमधील दत्तात्रेय स्वामींचा अनुग्रह घेतला होता. शंकर श्रीकृष्ण देव हे अनेक दिवस डोमगाव मठात येऊन राहिले होते. त्यांनी तेथून मूळ दासबोधाची शुद्ध प्रत लिहून घेतली व त्यावरून दासबोध प्रसिद्ध केला.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना श्री तुकाराम चैतन्य महाराजांकडे पाठवणारे श्री रामकृष्ण स्वामी हे कल्याण स्वामी शिष्य परंपरेतील होते .हि परंपरा खालील प्रमाणे:- समर्थ रामदास स्वामी -श्री कल्याण स्वामी-श्री बाळकृष्ण स्वामी-श्री चिंतामणी स्वामी -श्री रामकृष्ण स्वामी- श्री तुकाराम चैतन्य-श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

समर्थ रामदासांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी समाधिस्त होताच गादीवर कोणी बसावे, याबाबतीत तेथल्या शिष्यगणात मनस्वी भांडाभांड, दंगल झाली. प्रकरण मारामारीपर्यंत जाऊन कित्येकांची डोकी फुटली. ही बातमी सातारच्या छत्रपती शाहू महाराजांपर्यंत जाताच त्यांनी तात्काळ ‘आम्ही जातीने येऊन काय तो निर्णय ठरवू’ असा तातडीचा संदेश गडावर पाठवला. त्याप्रमाणे छत्रपती गडावर गेले. चौकशी केली. ‘श्रेष्ठीच्या वंशातील कोणी आहेत काय? असल्यास आमच्यासमोर त्यांना हजर करा.’ वंशज येऊन दाखल झाले. समर्थांच्या गादीवर बसायला कोण तयार आहे? असा प्रश्न टाकला. जो तो काकू करू लागला. मुख्य अडचण होती काटेकोर ब्रह्मचर्याच्या व्रताची! महाराजांपुढे ती मांडण्यात आली. ‘ठीक आहे आम्ही ती अडचण दूर करतो. या गादीवरील मठाधिपतीने विवाह केला तरी चालेल.’ अडचण दूर होताच एक मुलगा तयार झाला. श्रीफळ, महावस्त्र अर्पण करून छत्रपतींनी त्याची समर्थांच्या गादीवर अधिपती म्हणून नेमणूक केली आणि ‘आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिकारी नेमण्याचे अधिकार छत्रपतींना आहेत त्याप्रमाणे चालावे’ असा लेखी हुकूम जारी केला.’

शिष्य परिवार

कल्याणस्वामींचे अनेक शिष्य होते. त्यांच्या मठांची संख्या २५०च्या जवळपास असून[ संदर्भ हवा ] हे सर्व मठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक या भागात आहेत.दासविश्रामधाम हा १२१ अध्यायांचा ग्रंथ कल्याण स्वामींच्या शिष्य शाखेमध्ये लिहिला गेला.ती परंपरा पुढील प्रमाणे समर्थ रामदास स्वामी ->श्री कल्याण स्वामी ->श्री शिवराम स्वामी आपचंदकर->श्री रामचंद्र स्वामी->आत्माराम स्वामी.

उपलब्ध माहितीनुसार काही शिष्यांची नावे :
केशव स्वामी -उंब्रज मठ

जगन्नाथ स्वामी – तडवळे मठ

दिगंबर स्वामी

नरहरी स्वामी

पुरुषोत्तम स्वामी

मुद्गल स्वामी, पट्टशिष्य – डोमगाव मठ उत्तराधिकारी

रामजी बाबा -बारामती मठ

शाम स्वामी

शिवराम स्वामी(१)

शिवराम स्वामी(२) -आपचंद मठ

सामराज

हरिबोवा भूमकर

स्वामीदास-तेलंगसी मठ

कल्याण स्वामींच्या काही स्वतंत्र रचनासंपादन करा

महावाक्य पंचीकरण-अध्यात्मतत्त्वज्ञान विशद करणारे अभंगबद्ध प्रकरण

रुक्मिणीस्वयंवर

ध्रुव आख्यान

सोलीव सुख

दासगीता

समर्थ कल्याण संवाद

समर्थ कल्याण संवाद–२

गणपती स्तवन

कल्याणस्वामींवरील पुस्तके

दासविश्रामधाम या ग्रंथातील अध्याय क्र.११५ व ११६ मध्ये श्री कल्याण स्वामींचे चरित्र आहे.

धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभेने कल्याणस्वामींच्या जीवनावर व साहित्यरचनेवर समर्थशिष्य कल्याण’ नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे.

कल्याण स्तवन (कवी – रामचंद्रपंत पंत अमात्य)

योगीराज श्रीकल्याणस्वामी (लेखक – सचिन जहागीरदार, शिवराम राजाराम ऊर्फ संजय रामदासी). सुयोग प्रकाशन, पुणे

समर्थशिष्य योगिराज श्री कल्याणस्वामी चरित्र (हिंदी, लेखक सचिन अशोक जहागिरदार)

श्री कल्याणस्वामी चरित्र (मराठी, लेखक – सुव्रतसुत)

डोमगावला जाण्याचे मार्ग

रेल्वेने पुण्याहून कुर्डूवाडी जंक्शन (जिल्हा सोलापूर) पासून बसने परांडा मार्गे डोमगावला जाता येते.
तसेच करमाळा,बार्शी,भूम वरून देखील बससेवा चालू असते.
एक वेळ अवश्य भेट द्या.

बहू मत्तमत्तांतरी दाटि जाली |
तयाचे पदीँ चित्तवृत्यादि ठेली |
जगज्जीवनाचा प्रभू जो अनामी |
नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी ||
कल्याणाचे नाम कल्याणकारी|
कल्याणाचे ध्यान सर्वांसि तारी|
कल्याणाचा हस्त माथा जयाचे|
चारी मुक्ती वंदिती पाय त्याचे||१||
कल्याण होणे जरी तूज आहे|
कल्याणपायीं मन स्थीर राहे|
कल्याणवाणी पडता सुकानीं|
कल्याण जाले बहुसाल प्राणी||२||
अविनाश हें नाम कल्याण ज्याचें|
करी सर्व कल्याण सर्वा जिवांचे |
समर्थें जनी ऊतरायासी पारी |
अशी ठेविली मूर्ति कल्याणकारी ||३||
श्रमहरणितटाकीं स्वामी कल्याणराजा |
परम दिनदयाळू नांदतो स्वामी माझा |
सदय ह्रदय ज्याचें ध्यान हे आठवीतां |
परम सफल येतो मोक्ष कल्याण हाता ||४||
बहू मत्तमत्तांतरी दाटि जाली |
तयाचे पदीँ चित्तवृत्यादि ठेली |
जगज्जीवनाचा प्रभू जो अनामी |
नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी ||५||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.

Related posts