Blog

भारतीय संविधानाचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

=======================================================================

आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक श्रेठ शिक्षण तज्ञ ,तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दीन दलितांचे कैवारी, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक, तत्त्ववेत्ते, महान विचारक,मानवतेचे पुजारी यांची आज जयंती आहे जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन! या महामानवाचे चरित्र व कार्याविषयी थोड़क्यात माहिती घेऊ या कोणत्याही महान व्यक्तीच्या कार्याची माहिती घेत असताना त्या काळातील सामाजिक, राजकीय ,धार्मिक, परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल तरच खरी व पूर्ण माहिती आपल्याला मिळेल कुरीति, चालीरीती, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा याने समाज ग्रासून गेला होता जाती ,धर्म ,पंथ, वर्ण भेद मानणाऱ्यांची खूप मोठी संख्या होती परकीय सत्ता, इंग्रजांचे अन्याय,अत्याचारीराज्य गुलामगिरी, भितीपोटी जीवन जगणारी निष्पाप लोक होती. रोगराई, दारिद्र्य, दुष्काळ या सगळ्यामुळे लोकं त्रासुन गेलेली होती गरीब असहाय होती, दीनदुबळ्यांची फरफट होत होती, फसवणूक व लुबाडणूक होत होती गरीब जनतेवर अन्याय होत होता अशा भयंकर परिस्थितीत डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला आई रमाबाई वडील रामराव यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी त्यांचा जन्म झाला

लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे चतुर हुशार चाणाक्ष होते म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय भारतासाठी अविस्मरणीय ऐतिहासिक ठरला 7 नोव्हेंबर रोजी डॉक्टर आंबेडकरांनी प्रथम शाळा प्रवेश केला म्हणून शासनाने 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केले आहे हा दिवस भारतीय इतिहासात खूप खूप महत्त्वाचा आहे भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे निर्माते, दिन दलितांचे कैवारी, एक महान विचारवंत, तत्त्वज्ञ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनातील पहिले पाऊल शाळेत टाकले तो शुभ दिवस मंगल दिवस या भारतमातेचे सुपुत्र ज्यांनी सात नोव्हेंबर या दिवशी प्रतापसिंह हायस्कूल सातारा या शाळेत प्रथम प्रवेश केला व त्यांची शिक्षणाची वाटचाल हळूहळू सुरू झाली .ज्यांनी आपल्या कोवळ्या मनाने, कोवळ्या फुलासारख्या तनाने, आनंदाने या शाळेत प्रथम प्रवेश केला तो दिवस किती भाग्याचा असेल! आपणा सर्वांसाठी सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, अनुकूल नसतानाही ज्यांनी शाळा एक मंदिर व शिक्षक हे पूज्य गुरु मानून अभ्यासाला सुरुवात केली अशाप्रकारे गुरूला श्रेष्ठ मानून गुरु चे वचन पाळून डॉक्टर आंबेडकर शिक्षणाच्या जीवनात पहिले पाऊल टाकले

जिद्दी, मेहनती व परिश्रमाने संघर्षपूर्ण प्राथमिक शिक्षण पूर्ण केले झाले त्यांच्या जीवनाचा इतिहास खूप आगळा-वेगळा आश्चर्यजनक आहे गरिबी, दारिद्र्य, पीडा, अवहेलना,अपमानाने या सर्व गोष्टीचा अनुभव घेत एखाद्या दगडापासून मूर्ती बनवताना त्या दगडाला किती त्रास होतो, किती दुःख यातना सहन कराव्या लागतात अगदी तशाच वेदना दुःख मनाला होत असतील! वाचन वेड! डॉक्टर आंबेडकरांचे वाचन वेड तर जगात प्रसिद्ध आहे जगाने अनुभवलेले आहे कारण त्या काळी ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे पुस्तके,ग्रंथ वाचन होय वाचनासाठी त्यांनी लहानपणापासूनच सुरुवात केली हे आपणाला वेगळे सांगायची गरज नाही पुढे त्यांनी अठरा-अठरा तास सलग अभ्यास व वाचन सुरू केले ते सतत अखंड वाचन करीत राहिले जणु” वाचाल तर वाचाल” या उक्तीप्रमाणे त्यांनी हजारो पुस्तकांचे वाचन केले अभ्यास केला व त्यातून त्यांना माणुसकी हाच खरा जगातील धर्म आहे असे कळले” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी ते पीइल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” असे विचार व्यक्त करत त्यांनी गुलामांना गुलामगिरीची जाणिव करून दिल्याशिवाय तो जागृत होत नाही तसेच देशाची अर्थव्यवस्था ही कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या घामावर चालते दीडशे वर्ष इंग्रजांच्या जोखडा खाली गुलामगिरीत त्रस्त जीवन काढून आज तरी नवीन युगात, नवीन पिढीला महत्त्वाचा मोलाचा संदेश डॉक्टर आंबेडकरांनी दिला शिक्षणाचे, महत्त्व समाजाला पटवून दिले, जातिभेद दूर करण्याचा प्रयत्न केला, दीनदुबळ्यांसाठी, अस्पृश्यांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी खूप खूप प्रयत्न केले व दिन दुबळ्यांचे कैवारी बनले! .

भारताचे अनमोल संविधान भारताचा महान व ऐतिहासिक ग्रंथ म्हणून भारताचे संविधानाचा उल्लेख केला तर त्यात काही नवल नाही संपूर्ण जगाला एक आदर्श नियमावली देणारे सर्वधर्मसमभाव, मानवजातीसाठी, मानवाच्या विकासासाठी,कल्याणासाठी घेतलेले योग्य निर्णय लोकशाहीची खरी तत्वतः पणाला लावून समाज विकास देश विकास यासाठी केलेली नि यमावली जी साऱ्या जगाला मान्य झाली ती म्हणजे आपल्या भारताचे संविधान होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून आपल्याला अनमोल असे संविधान दिले म्हणून त्यांना संविधानाचे पितामह असेही म्हटले जाते या संविधानाच्या नियमावलीप्रमाणे आरक्षणाची सुरुवात केली गेली आणि या आरक्षणानुसार सर्वांना मोठमोठ्या पदावर नोकऱ्या मिळाल्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने हे संविधान स्वीकारले. उच्च नीचता कमी करण्यासाठी भारतीय संविधानात अनेक अधिकार देण्यात आले आहेत संविधान दिन म्हणजे संपूर्ण भारत वासियांचा जवळपास सव्वाशे करोड लोकांच्या आनंदाचा व हक्काचा दिवस मानला जातो कायदा व स्वातंत्र्यासाठी जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते अठरापगड जातीचे लोक आपल्या भारतात राहतात तरी लोकशाही आजही टिकून आहे अशी मजबूत लोकशाही असलेली घटना डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे

आजच्या प्रत्येक नव युवकांना विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची माहिती होणे गरजेचे आहे सर्व भारतीयांना एकत्रित एका सूत्रात आणण्याचे काम या संविधानाने केलेले आहे डॉक्टर आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार राजकीय विचार सामाजिक विचार तसेच त्यांचे पुस्तकावरील प्रेम वाचन प्रेम त्यांच्या काळातील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या समोर येणाऱ्या सर्व बाजूने येणाऱ्या संकटांना कशा पद्धतीने आंबेडकर व त्यांच्या कुटुंबीयांनी तोंड देऊन आपले शिक्षणाचे कार्य चालू ठेवले सामाजिक कार्य सक्रियतेने केले हे आपणा सर्वांना माहितीच आहे शिक्षणापासून दूर ठेवणे, शाळेत गावात शहरात समाजापासून दूर ठेवणे ,वेळप्रसंगी मारहाण करणे जाचक व जुलमी त्यांना सामोरे जात दुःख अपमान सहन करीत डॉक्टर आंबेडकरांचे बालपण गेले व शिक्षण पूर्ण केले व आधुनिक भारताचे शिल्पकार बनले. आज डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व तरुण युवकांनी त्यांच्या विचारांचे त्यांच्या कार्याची ओळख असणे गरजेचे आहे त्यांचे विचार आत्मसात करणे व आधुनिक काळात आपलेही करिअर बनवणे या गोष्टीकडे नव्या युवकाने लक्ष देणे गरजेचे आहे पुनश्च एकदा जयंती दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

Related posts