महाराष्ट्र

शरद पवारांच्या निवासस्थानासमोर बंदोबस्त वाढवला

उजनीच्या पाणी प्रश्नावरुन सोलापूरकर आक्रमक
उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर (जि. पुणे) तालुक्याला देण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केले असले तरी अद्याप हा वाद शमलेला नाही. बुधवारी (दि. २६) सोलापूरहून येत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर आंदोलनाचा प्रयत्न झाला. पोलिसांनी वेळीच हालचाल करत दोघा आंदोलकाना ताब्यात घेतले. दरम्यान या घटनेनंतर गोविंदबागेसमोरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ आदी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या व नेते मंडळींच्या रेट्यामुळे अखेर हा निर्णय मागे घेत असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केले. परंतु तसा कोणताही शासकिय आदेश अद्याप निघालेला नाही. त्यामुळे या विषयाची धग अद्याप कायम आहे. दुसरीकडे पाणी देण्याचा निर्णय रद्द झाल्याने इंदापूरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी हक्काच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्यात आंदोलने सुरु केली आहेत.
दरम्यान बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी खासदार शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे येथील बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिसांनी दोघा शेतकऱ्यांना येथे दाखल होण्यापूर्वीच ताब्यात घेतले. बारामती – निरा रस्त्यावर वाहनचालकांची तपासणी सुरु केली आहे. वाहने तपासूनच पुढे सोडली जात आहेत. गोविंदबागेसमोरील बंदोबस्त कायम आहे.

Related posts