पंढरपूर

स्वेरीचा राजस्थान मध्ये समाजोपयोगी तंत्रज्ञानावरील मेळावा संपन्न.

पंढरपूर प्रतिनिधी गणेश महामुनी

पंढरपूर- जयपुर (राजस्थान) मधील मदरसा हुसेनिया, टाकिया, चीनी की बुर्ज येथे स्वेरी तर्फे जयपुर परिसरातील नागरिकांसाठी ‘तंत्रज्ञानाचा हस्तकौशल्य विकासासाठी वापर’ या विषयावर नुकताच प्रात्यक्षिकासह मेळावा संपन्न झाला. यासाठी तेथील महिला वर्गाबरोबरच पुरुष नागरिक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

बांगडी हा दागिना महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून त्यासाठी मोठी मागणीही असते. राजस्थानी संस्कृतीमध्ये व लोकनृत्यात बांगडीच्या विविध नमुन्यांचा वापर होत असतो त्यामुळे बांगडी बरोबरच लाखेच्या बांगडीला देखील खूप मागणी असते. लाखेची बांगडी बनविण्याची राजस्थानमधील जी पारंपारिक पद्धत आहे, त्यात महिला वर्गाला अधिक परिश्रम करावे लागतात त्याचसोबत वेळ देखील अधिक लागतो. हाच धागा पकडून त्या प्रक्रियेत अधिक सुधारणा व्हावी या हेतूने स्वेरी अभियांत्रिकीचे चार प्राध्यापक व एक विद्यार्थी अशा पाच जणांनी सहभागी होवून लाखेच्या बांगडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जयपुर मधील २०० ते २५० हस्त कलाकारांसाठी चर्चा सत्राचे आयोजन केले होते. या चर्चा सत्रामध्ये स्वेरीने तयार केलेल्या लाख बांगडी मशीनवर प्रात्यक्षिके करण्यात आली. जयपुर मधील प्रसिद्ध हस्तकलाकार व राष्ट्रीय पारितोषीक विजेते शादाब अहमद यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविकात जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्ही.के.सुरी यांनी या चर्चासत्राचे प्रयोजन आणि ‘स्वेरी’ ने तयार केलेली लाखेच्या बांगडीची मशीन जयपुरमध्ये कशाप्रकारे फायदेशीर ठरेल हे सांगितले. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी या मशीन विषयी सविस्तर माहिती दिली.

पुढे त्यांनी सदर मशीन पंढरपूर मधील व्यावसायिकांना कशाप्रकारे फायदेशीर ठरले आहे त्याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर ‘फोटो केमीकल मशिनिंगचा वापर’ हा व्यावसायिक उत्पादनासाठी केला जाऊ शकतो याबाबतही सविस्तर माहिती दिली. स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांनी आपल्या मार्गदर्शनातून जयपूरमधील व्यावसायीकांना व कलाकारांना स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांची सविस्तर माहिती दिली तसेच स्वेरीतील संशोधनाच्या गरुड झेपेबद्दल आणि मिळालेल्या संशोधन निधी बद्धल सविस्तर सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल अवार्ड विनर आर्टिस्ट आयाज महंमद हे होते. त्यांनी स्वेरीने तयार केलेल्या मशीनचे कौतुक केले व व्यावसायिकांना मशीन वापरण्याचे फायदे सांगितले. यावेळी पंढरपूर मधील लाख बागडी उदयोजक असलेले स्वेरीचे माजी विद्यार्थी यासीन बागवान जे स्वेरीने तयार केलेली मशीन मागील तीन वर्षांपासून वापरतात ते उपस्थित होते. स्वेरीने तयार केलेले मशीन वापरण्याने त्यांना झालेला फायदा व वेळेची बचत यावर त्यांनी भाष्य केले तसेच मशिनच्या सहाय्याने लाईव्ह डेमो सादर केला.

यावेळी जयपुर मधील उद्योजक आर.के. गुप्ता यांनी स्वेरीने घेतलेल्या या पुढाकारासाठी जयपुर मधून जी काही मदत लागेल त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. राज्याबाहेर जाऊन तेथील समाजासाठी स्वेरीने हे पाऊल उचलले त्याबद्धल स्वेरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हस्तकलाकार इनाम अहमद यांनी सर्वांचे आभार मानले. हे सत्र पार पाडण्यासाठी प्रा. अविनाश सपकाळ व विशाल लावंड यांनी परिश्रम घेतले.

Related posts