भारत

उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीची वाढ होतेय; ममता बॅनर्जीं

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना टोला लगावला. उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीचीच वाढ होतेय, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदींना टोला लगावला. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या.

शुक्रवारी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “उद्योगांची वाढ थांबली आहे. परंतु त्यांची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दाढी वाढत आहे. काहीवेळा ते स्वत:ला स्वामी विवेकानंद म्हणवतात आणि काहीवेळा ते स्टेडिअमचं नाव बदलून आपलं नाव ठेवतात. त्यांच्या डोक्यात काही बिघडलंय, त्यांच्या स्क्रू ढिला झालाय असं वाटतंय,” असं म्हणत ममता बॅनर्जींनी मोदींवर निशाणा साधला. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
दाढी वाढवून कोणी रविंद्रनाथ टागोर होत नाही

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, दाढी वाढवून कोणी रविंद्रनाथ टागोर होता येत नाही. नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? सरकारी मालमत्ता विकायला काढल्या जात आहेत आणि आता बंगालचा सोनार बांग्ला करण्याच्या बाता मारत आहेत. रविंद्रनाथ टागोर यांची जन्मभूमी जोडासांकू सांगतात. विद्यासागर यांची मूर्ती तोडतात. गुजरातमधील दंगलीचे नायक आहेत,” असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
दरम्यान, शनिवार, २७ मार्च रोजी पश्चिम बंगालमधील पाच जिल्ह्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील ६, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील ७, झाडग्राम जिल्ह्यातील ४ तर पुरुलिया जिल्ह्यातील ९, बाकुंडा जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, यात ७३ लाख ८० हजार ९४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत असणार आहे.

Related posts