पंढरपूर

पंढरपुर तालुक्यातील हजारों एकर डाळिंब व द्राक्षबागांना अवकाळी पाऊसाने नुकसान

सरकारने नुकसान भरपाई देण्याची शेतकर्यांची मागणी…..

सचिन झाडे –
पंढरपूर – बदलत्या हवामानामुळे पडणाऱ्या अवकाळी पावसाने पंढरपूर तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पहीली मदत मिळत नाही तोपर्यंत अवकाळीचा पुन्हा तडाखा बसल्याने आता शेतकरी चिंतातुर झाला आहे.

काल मध्यरात्रीपासून पंढरपूर तालुक्‍यात अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसाचा द्राक्ष ,डाळिंब बागांसह रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे तालुक्‍यातील सुमारे 8 ते 10 हजार एकरावरील द्राक्षबागा धोक्‍यात आल्या आहेत. तर डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे तालुक्‍यातील ऊसतोडी बंद झाल्या आहेत. परिणामी, कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेवर परिणाम झाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे पार कंबरडे मोडले आहे. सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू यासह अन्य फळबागा व भाजीपाल्याची शेती धोक्‍यात आली आहे. यावरही मात करत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

अशातच बुधवारी कालपासून अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे कांदा तूर मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गुरुवारी पहाटेपासून पावसाचा आणखी जोर वाढला आहे. मध्यरात्री सुरू झालेला पाऊस सलग आठ तासाहून अधिक काळ सुरू असल्याने डाळिंब व द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पंढरपूर तालुक्‍यात सुमारे 8 ते 10 हजार एकरावर द्राक्षबागा आहेत तर सुमारे 12 हजार एकरावर डाळिंबाचे पीक आहे. संततधार पावसामुळे द्राक्ष घडात पाणी शिरल्याने कुजवा आणि दावण्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. तर अनेक ठिकाणी द्राक्षावरील फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल, अशी शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका कासेगाव, टाकळी, बोहाळी, खर्डी या भागातील द्राक्षबागांना बसला आहे.

Related posts