महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे.

नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी नितेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.

दरम्यान आतापर्यंत दाखल गुन्हे रद्द करण्याच्या आणि अटकेपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नोटीस न देताच अटकेच्या करवाईचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र कोर्टाने योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश वकिलाला देत तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले आहेत. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Related posts