महाराष्ट्र

वीज बिले माफ होत नाहीत तोपर्यंत आंदोलन : राजू शेट्टी

राज्य सरकारने महावितरण कंपनीला घरगुती आणि शेती वीज बिल न भरलेल्यांची वीज कनेक्शन तोडण्याची परवानगी दिली. यावर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला यावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात आज महामार्ग रोखण्यात आला. माजी खासदार शेट्टी म्हणाले की, आपला रोष व्यक्त केल्याखेरीज सरकार खडबडून जागे होणार नाही. म्हणूनच सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.
यावेळी जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी लॉकडॉउन काळातील सर्वसामान्य ग्राहकाचे वीजबिल माफ करावे यासाठी कोल्हापूर जवळील पंचगंगा पूल इथे एकत्र आले आहेत. यावेळी आंदोलकांनी पुणे -बंगळूर महामार्ग रोखला. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही बाजूची वाहतूक अडवून धरल्याने मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नका. कोरोना आणि महागाईमुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. दरम्यान लॉकडाउन काळात वाढीव वीज बिले आल्याने राज्य सरकारने यावर योग्य निर्णय घेऊन तोडगा काढावा असे राजू शेट्टी यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारला मोठ्या विश्वासाने लोकांनी सत्तेवर बसवले आहे त्यांच्या विश्वासास पात्र राहून सरकारने दिलेले आश्वासन पाळावे असेही शेट्टी यांनी सांगितले.
याचबरोबर वीज बिले माफ होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. राज्य सरकारकडून जबरदस्ती वीज बिले वसूल करण्यात येत असतील तर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

Related posts