महाराष्ट्र

लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा

श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये ०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात व संकल्पसिद्धीने साजरा झाला. मागील दोन ते अडीच वर्षापासून सगळे जग कोरोना महामारीला सामोरे जात आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांच्या उपचाराअंतर्गत ऑक्सीजन मिळवणेसाठी आप्तेष्ठांनी काय काय उपाययोजना केल्या याबाबतीत आपण सर्वजण ज्ञात आहोत. याकामी निसर्गातील ऑक्सीजन चे महत्व आपणा सर्वांना जाणवू लागले.
त्यासोबतच अगणित हानी झालेल्या पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज भासू लागली आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी वर्ग, आजी-माजी विद्यार्थी यांना आवाहन करण्यात आले होते, की पर्यावरण संवर्धंनासाठी खारीचा वाटा म्हणून प्रत्येकी ०५ वृक्षांची लागण करावयाची व त्याचे संवर्धन करावयाचे. या वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेमध्ये सर्व प्राध्यापक, विद्यार्थी यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात, शेताच्या बांधावर कडूनिंब, आंबा, चिंच, पेरु, नारळ, चिक्कू, उंबर, पिंपळ, लिंबू, सीताफळ, गुलमोहोर, रामफळ, केळी, जांभूळ, अशोक, बांबू, गुलाब, कडीपत्ता इ. जवळपास १५० हून अधिक वृक्षांची लागवड केली आहे, व ती झाडे मोठी होईपर्यंत त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारीही घेतली आहे. भविष्य काळात निरोगी जीवन उपभोगावयाचे असल्यास आतापासूनच पाऊले उचलली गेली पाहिजेत. तरच पर्यावरणाची होत असलेली हानी कमी करता येईल. त्या दृष्टीने सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांनी घ्यावा ही अपेक्षा!

Related posts